पाचगणीतील अवकाळी गावाच्या हद्दीत अनोळखी महिलेचा गळफास घेऊन मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पाचगणीतील अवकाळी गावाच्या हद्दीत अनोळखी महिलेचा गळफास घेऊन मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पाचगणी प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी गावाच्या हद्दीत एका २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेने निलगिरीच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पाचगणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचगणी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी ते राजमनरॉक पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘तंबुची जांभळ’ नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी दहा वाजण्यापूर्वी ही घटना घडली. संबंधित महिला निलगिरीच्या झाडाला फिक्कट हिरव्या रंगाच्या ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. अवकाळी गावचे पोलीस पाटील शैलेश विष्णू भिलारे यांनी घटनेची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास पाचगणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment