प्रतापगडावर शिवजयंती उत्सवासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन; विविध विभागांना जबाबदाऱ्या, १९ फेब्रुवारीपर्यंत तयारी पूर्ण करण्याचे आदेश

प्रतापगडावर शिवजयंती उत्सवासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन; विविध विभागांना जबाबदाऱ्या, १९ फेब्रुवारीपर्यंत तयारी पूर्ण करण्याचे आदेश

प्रतापगड | प्रतिनिधी
किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सन २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने व्यापक आणि सुसूत्र नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी सर्व संबंधित विभागांना ठोस जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विजय बिनगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता किल्ले प्रतापगड येथे नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस गटविकास अधिकारी वर्ग-२, पंचायत समिती महाबळेश्वर, विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि पंचायत समिती सदस्य संजय मोरे उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष महोदयांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून शिवजयंती उत्सवाचे आयोजन हे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक जाणीव जागवणारा सोहळा असल्याने सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. मागील बैठकीतील सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासंबंधी नियोजन, निमंत्रणपत्र छपाई व वितरण, स्टेज उभारणी, विद्युत व प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालये, आसनव्यवस्था, फोटोग्राफी व लाईव्ह कव्हरेजची व्यवस्था तसेच कार्यक्रमानंतर अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाला किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, बॅरिकेडिंग, सुरक्षा उपाययोजना व पाणी निचरा व्यवस्थेची कामे सोपवण्यात आली.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा, टँकरद्वारे पाण्याची उपलब्धता आणि नळ जोडण्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. वन विभागाला परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, झाडांच्या फांद्यांची छाटणी व सुरक्षिततेसाठी सूचना फलक लावण्याची जबाबदारी देण्यात आली. वीज वितरण विभागाला अखंड व सुरक्षित वीजपुरवठा तसेच आवश्यकतेनुसार जनरेटरची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले.

परिवहन विभागाला भाविकांसाठी अतिरिक्त एस.टी. बसेसची सोय करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत व कृषी विभागाला स्वच्छता मोहीम राबवणे, स्वयंसेवकांची नियुक्ती व कार्यक्रम समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. शिक्षण विभागाला शाळांमध्ये शिवजयंती जनजागृती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले. आरोग्य विभागाला वैद्यकीय पथक, स्वच्छता व आरोग्य सुविधा आणि पाण्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

नगरपरिषद विभागाला परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले, तर पोलीस विभागाला कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली. वन व्यवस्थापन समिती व पंचायत समिती अंतर्गत प्रकल्प विभागाला स्वयंसेवकांच्या माध्यमातून सहकार्य, रंगोली सजावट आणि स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सोपवण्यात आले.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्लास्टिक वापर टाळणे, किल्ला व परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा न टाकणे आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला.

सदर शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भातील सर्व कामे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यावर होणारा हा शिवजयंती सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरेल, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

अखेर अध्यक्ष महोदयांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl