पार येथे भाजप प्रचारा साठी शिवेंद्रराजे मैदानात ; रोपवे, रस्ते आणि पर्यटन विकासासाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा

पार येथे भाजप प्रचारा साठी शिवेंद्रराजे मैदानात ; रोपवे, रस्ते आणि पर्यटन विकासासाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा

महाबळेश्वर प्रतिनिधी – ll

महाबळेश्वर तालुक्याच्या दळणवळण, पर्यटन आणि सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी किल्ले प्रतापगड ते वाडाकुंभरोशी दरम्यान सुमारे चार किलोमीटर लांबीचा रोपवे उभारण्यात येणार असून, तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांचे जाळे भक्कम करून विकासाची गंगा घराघरांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी ठाम ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या सभेला माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, भाजपचे चिन्मय कुलकर्णी, रवींद्र कुंभारदरे, विजय भिलारे, भिकू दादा सोंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवकांनी सभेला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणात पार (पार्वतीपूर) हे जागृत देवस्थान असल्याचे नमूद करत या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आपण वैयक्तिकरीत्या प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध असून, योग्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर काम मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. हे सर्व विकासप्रकल्प यशस्वी करण्यासाठी जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देताना ना. भोसले म्हणाले की, भाजप हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा पक्ष नसून सर्वसमावेशक विचारधारेचा पक्ष आहे. भाजपकडून मुस्लिम महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, देशभरात अनेक मुस्लिम उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अमीना शारवान यांच्यासह सर्वच भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाबळेश्वर तालुक्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती देताना त्यांनी बामणोली ते तापोळा रस्ता जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मुनावळे ते कोकण जोडणारे सुमारे ३५० कोटी रुपयांचे काम सुरू असून, प्रतापगड ते पार दरम्यानच्या १२ कोटी रुपयांच्या रस्त्यालाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, शिकेकाई लिलाव आणि वाडा–प्रतापगड केबल मार्ग याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, आपण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, मात्र आज भाजपमध्ये मंत्री म्हणून काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत, हाच भाजपचा खरा विजय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या सभेदरम्यान वाळणे येथील सुनील तांबे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुभाष सोंडकर (तळदेव गट), सुरेश जाधव (कुंभरोशी गण), गोविंद सकपाळ (तळदेव गण) आणि अमीना शारवान (मेटगुताड गण) यांच्यासह जगन्नाथ शेटे, सुभाष शंकरराव सोंडकर, शिवाजी राजापुरे, तुकाराम सपकाळ, संजय मोरे, प्रकाश सोंडकर, विलास जाधव (गुरुजी), संदीप जाधव तसेच भाजपचे कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl