कुंभरोशी परिसरात प्रचाराचा झंझावात; शिवसेनेच्या उमेदवारांसाठी महिलांची गावोगाव घरभेट मोहीम
कुंभरोशी परिसरात प्रचाराचा झंझावात; शिवसेनेच्या उमेदवारांसाठी महिलांची गावोगाव घरभेट मोहीम
कुंभरोशी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटातील कुंभरोशी परिसरात प्रचार वेगाने रंगत आहे. शिवसेनेचे तळदेव गटाचे उमेदवार अजित सपकाळ तसेच कुंभरोशी गणाचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारासाठी महिलांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेत मैदानात उतरून गावोगाव घरभेटी देत प्रचाराचा झंझावात उभा केला आहे.
महिला कार्यकर्त्या घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत असून शिवसेनेला दिलेले मत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले मत असल्याचा संदेश प्रभावीपणे देत आहेत. ‘लाडका भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून उभे असलेले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावेत, असे आवाहन महिलांकडून करण्यात येत आहे.
या घरभेटी दरम्यान विकासकामे, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी चर्चा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे महिलांकडून सांगण्यात येत असून त्याच विश्वासावर अजित सपकाळ व संजय मोरे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महिलांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे तळदेव गट व कुंभरोशी गणातील निवडणूक वातावरण अधिक तापले असून शिवसेनेच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली आहे. महिलांची एकजूट, जोश आणि घराघरात पोहोचलेला प्रचार पाहता या निवडणुकीत शिवसेनेची ताकद अधिक ठळकपणे जाणवत आहे.
Comments
Post a Comment