नांदवळ अनाथ आश्रम प्रोजेक्टला नगरपालिकेचा भक्कम पाठिंबा; इनरव्हील क्लबच्या सामाजिक कार्याला नवे बळ
नांदवळ अनाथ आश्रम प्रोजेक्टला नगरपालिकेचा भक्कम पाठिंबा; इनरव्हील क्लबच्या सामाजिक कार्याला नवे बळ
✍️मिलिंद काळे -
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपालिकेत नुकताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शहराच्या सामाजिक जाणीवेचे सकारात्मक दर्शन घडले. यावेळी महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या नांदवळ अनाथ आश्रम प्रोजेक्टसाठी नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासीरभाई मुलाणी तसेच नगरसेवक आबा शिंदे, ॲड. संजय जंगम, समीर सुतार, रोहित ढेबे, रवी कुंभारदरे, विमल ताई पार्ठे, पल्लवी कोंढाळकर आणि स्मिता पाटील यांनी इनरव्हील क्लबच्या या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टसाठी उदार आर्थिक सहकार्य केले. या योगदानामुळे नांदवळ येथील अनाथ व गरजू मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे.
महाबळेश्वर इनरव्हील क्लब गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. प्रत्यक्ष मदतीसोबतच जनजागृती कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, निधी संकलन, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच डिजिटल माध्यमांतून समाजप्रबोधन अशा विविध माध्यमांतून क्लबचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नांदवळ अनाथ आश्रम प्रोजेक्टच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी सुरक्षित, सशक्त आणि उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा इनरव्हील क्लबचा प्रयत्न आहे.
या सत्कार व सहकार्य कार्यक्रमास मुख्याधिकारी योगेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार विलास काळे, ज्येष्ठ पत्रकार रमेश पल्लोड, अर्बन बँकेचे विद्यमान संचालक शरद बावळेकर यांच्यासह इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्ठे, वाइस प्रेसिडेंट मुक्ता कोमटी, सेक्रेटरी सपना अरोरा, पीडीसी रोहिणी वैद्य, सविता पल्लोड, आदिती भांगडिया, वंदना पल्लोड, मनिषा कोमटी, गायत्री जाधव आणि स्मिता जाधव उपस्थित होत्या.
नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी सामाजिक उपक्रमांसाठी दाखविलेल्या सकारात्मक आणि संवेदनशील भूमिकेबद्दल इनरव्हील क्लबच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. सहकार्य, सामाजिक जाण आणि माणुसकीच्या भावनेतून उभा राहिलेला हा उपक्रम नांदवळ अनाथ आश्रमासाठी निश्चितच आशेचा नवा किरण ठरणार आहे.
Comments
Post a Comment