निवडणूक संपली, आता सलोख्याची नवी सुरुवात करा – गावपातळीवर एकजुटीचे आवाहन


निवडणूक संपली, आता सलोख्याची नवी सुरुवात करा – गावपातळीवर एकजुटीचे आवाहन

महाबळेश्वर प्रतिनिधी -

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मतभेद आणि मनभेद निर्माण झाले होते. निवडणूक म्हटले की गटतट, स्पर्धा आणि ईर्षेचे राजकारण अटळ असते. मात्र ते ठराविक काळापुरतेच मर्यादित ठेवणे गरजेचे असते. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मनात राग, द्वेष आणि आकस धरून एकमेकांवर रोष ठेवण्याचे कोणतेही कारण उरत नाही. ‘झाले गेले गंगेला मिळाले’ या भावनेतून सर्वच नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदिलाने मित्रत्वाचे संबंध जपावेत, असे आवाहन होत आहे.

राजकारण हा कायमस्वरूपी कोणाचा प्रांत नसतो. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो. गुलाल उधळला की सारे काही संपते आणि पुढील पाच वर्षे पुन्हा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागते. तोपर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदललेली असतात. आजच्या राजकारणात निष्ठा कमी होत चालली असल्याने कोणीही कोणावर द्वेष मनात धरू नये. आपल्या गल्लीतले, गावातले जिवलग मित्र केवळ राजकारणामुळे दुरावले असतील, तर प्रत्येकाने मोठ्या मनाने पुन्हा एकत्र यावे. हेच लोकशाहीचे आणि समाजजीवनाचे खरे सौंदर्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

स्थानिक पातळीवरील राजकारण अत्यंत संवेदनशील आणि अवघड असते. त्यामुळे निवडणुकीतील कटुता मनात ठेवून पुढे जाण्याऐवजी, ती विसरून पुन्हा पूर्वीसारखे मित्रत्व जपणे आवश्यक आहे. येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वांनी मिळून सहभाग घेत गावपातळीवरील राजकारण आणि समाजकारण पुढे न्यावे. कोणासाठी कोणी अबोला धरू नये, राग मनात ठेवू नये. तरच गावाचा खरा विकास साध्य होईल. अन्यथा विरोधाला विरोध वाढत जाऊन विकास मागे पडेल आणि दुश्मनी पुढे येईल, असे घडू नये, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गावपातळीवरील चावडीवर पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र बसून गप्पागोष्टी कराव्यात, हास्य-विनोदात जुने मतभेद विसरून नव्या सुरुवातीला सामोरे जावे. “हे असं झालं असतं तर, तो असा वागला नसता तर” अशा जर-तरच्या चर्चांमध्ये अडकण्यापेक्षा, भविष्यासाठी सकारात्मक विचार करून एकत्र पुढे जाणे हाच खरा मार्ग आहे, असा एकमुखी सूर उमटत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl