नागेश्वर डोंगरावर शंभूभक्तीचा महासागर; कोयना जलाशयातून बोटीने प्रवास करत भाविकांचा दर्शनासाठी ओघ
कास| प्रतिनिधी :
वासोटा किल्ल्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या स्वयंभू नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त शंभूभक्तांचा अक्षरशः सागर उसळला होता. पहाटेपासूनच बामणोली, शेंबडी आणि मुनावळे येथून शेकडो बोटींच्या माध्यमातून भाविक कोयना नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातून प्रवास करत नागेश्वराच्या डोंगराकडे रवाना होत होते. दीड तासांच्या जलप्रवासानंतर कठीण डोंगरवाट चढून भाविकांनी हर हर महादेवाच्या गजरात नागेश्वराचे दर्शन घेतले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात अत्यंत दुर्गम भागातील सुळक्यावर वसलेले हे प्राचीन स्वयंभू शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांना आकर्षित करते. नैसर्गिक सौंदर्य, जंगलातील शांतता आणि अध्यात्मिक वातावरण यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष यात्रा भरते. यानिमित्त सातारा व कोकण पट्ट्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते.
नागेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठी किल्ले वासोटा पायथा मेट इंदवली येथून पायवाटेचा मार्ग असून हा संपूर्ण मार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातून जातो. त्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय बामणोली व कांदाटी यांच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण यात्रा कालावधीत तैनात होते. प्रवास मार्गावर तसेच देवस्थान परिसरात सतत गस्त घालण्यात येत होती.
नागेश्वराच्या दर्शनासाठी कोयना शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रातून सुमारे दीड तासांचा जलप्रवास करावा लागतो. यासाठी बामणोली, शेंबडी आणि मुनावळे या तीन ठिकाणांहून भाविकांसाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. वन्यजीव बामणोली कार्यालयाकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विनामूल्य परवानगी देण्यात आली होती. तसेच दोन दिवस संपूर्ण परिसरात वन विभागाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निसर्गाच्या सान्निध्यातील हा अनोखा जलप्रवास, त्यानंतरची जंगलवाट आणि डोंगर चढाई यामुळे दर्शनाचा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले. हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षेची योग्य काळजी आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली.
नागेश्वर डोंगरावर उसळलेल्या या शंभूभक्तीच्या महासागरामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, महाशिवरात्रीच्या दिवशी कोयना खोऱ्यात एक आगळावेगळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
---
Comments
Post a Comment