आंबेनळी घाटात धिप्पाड रानगव्याचा अपघाती मृत्यू; मानव–वन्यजीव संघर्षाचे गंभीर वास्तव पुन्हा समोर
आंबेनळी घाटात धिप्पाड रानगव्याचा अपघाती मृत्यू; मानव–वन्यजीव संघर्षाचे गंभीर वास्तव पुन्हा समोर
✍️शरद झावरे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
आंबेनळी घाट परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, मेटतळ्याच्या खालच्या बाजूस असलेल्या कठड्यावरून घसरून एक धिप्पाड रानगवा थेट खोल दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा रानगवा दरीतून घसरत थेट आंबेनळी घाटाच्या मुख्य रस्त्यावर येऊन पडला. घाटातील वळणावळणाचा अरुंद रस्ता, खोल दरी आणि आजूबाजूला असलेली दाट वनराई यामुळे हा अपघात अधिक भीषण ठरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर काही वेळातच मुख्य रस्त्यावर रानगवा मृत अवस्थेत पडलेला दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून हा गवा पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत रानगव्याची पाहणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या.
अलीकडच्या काळात रानगवे, बिबटे, हरणे यांसारखे वन्यप्राणी सातत्याने घाट रस्ते, पर्यटनस्थळे आणि नागरी वस्तीच्या जवळ दिसून येत आहेत. जंगलालगत वाढलेली मानवी वस्ती, रस्त्यांचे जाळे, वाढती वाहनसंख्या आणि अन्नाच्या शोधात भटकणारे वन्यप्राणी यामुळे मानव–वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. विशेषतः आंबेनळी घाटासारख्या संवेदनशील भागात रस्त्यालगत असलेले कठडे, खोल दऱ्या आणि वाहनांचा वेग हे वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका ठरत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे वन्यप्राणी संरक्षणासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना कधी राबवण्यात येणार, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. घाट रस्ते आणि पर्यटनस्थळांवर वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणणे, ठळक सूचना फलक लावणे, संवेदनशील भागात विशेष दक्षता घेणे आणि पर्यटक व वाहनचालकांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक झाले आहे.
आंबेनळी घाटातील हा अपघात केवळ एका रानगव्याच्या मृत्यूपुरता मर्यादित नसून, तो मानव आणि निसर्ग यांच्यातील ढासळत चाललेल्या समतोलाचे गंभीर वास्तव दाखवणारा इशारा आहे. निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ यंत्रणांची नव्हे, तर समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Comments
Post a Comment