शिवगर्जनेने दुमदुमला सातारा : ‘जय शिवाजी जय भारत’ मेगा पदयात्रेत १२ हजारांहून अधिक शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

शिवगर्जनेने दुमदुमला सातारा : ‘जय शिवाजी जय भारत’ मेगा पदयात्रेत १२ हजारांहून अधिक शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

सातारा प्रतिनिधी —
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून ‘माय भारत’ युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘जय शिवाजी जय भारत’ मेगा पदयात्रा गुरुवारी सातारा नगरीत अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडली. टाळ-मृदुंगांचा गजर, पोवाडे, लेझीम, ढोल-ताशे, घोडेस्वार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा, वासुदेव आणि विविध सांस्कृतिक पथकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण सातारा शहर शिवमय झाले होते. या ऐतिहासिक पदयात्रेत तब्बल १२ हजारांहून अधिक शिवभक्त, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गांधी मैदान येथून प्रारंभ झालेल्या या मेगा पदयात्रेला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, माय भारत युवा कार्यक्रमाचे राज्य निदेशक कालीदास घाटवळ, माय भारतचे क्षेत्रीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी, रंगीबेरंगी पताका आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण राजपथ उत्सवमय झाला होता. पदयात्रेदरम्यान चौकाचौकांत शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. पोवाडे, लेझीम पथक, झांजपथक, ढोल-ताशांच्या निनादात शिवगर्जनेचा जागर सातारा नगरीत अनुभवायला मिळाला.

ही भव्य मेगा पदयात्रा शिवतीर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने समारोपाला पोहोचली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर ‘जय शिवाजी जय भारत’ मेगा पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा नगरीत या उपक्रमाचा प्रमुख कार्यक्रम पार पडत असून, शिवरायांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रभावी माध्यम ठरत आहे. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असून, युवकांनी माय भारतच्या पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडून देश उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचवण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. शिवछत्रपतींच्या भूमीत, शाहुनगरी साताऱ्यात ही मेगा पदयात्रा होणे हे अभिमानास्पद आहे. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य, लोकाभिमुख कारभार आणि राष्ट्रप्रेम यांचा आदर्श शिवरायांनी घालून दिला असून, ही पदयात्रा त्या विचारांचा जागर घडवणारी आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य हे राष्ट्रभक्ती, स्वधर्म, स्वराष्ट्र आणि शौर्याचा आदर्श वस्तुपाठ असल्याचे सांगितले. तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी युवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान ‘युवा शक्ती करेगी भारत का निर्माण’ ही प्रेरणादायी चित्रफीत सादर करण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि शिवगर्जनेने संपूर्ण वातावरणात चैतन्य फुलले. शिस्तबद्ध नियोजन, व्यापक सहभाग आणि भावनिक उत्साह यामुळे ही मेगा पदयात्रा सातारा शहराच्या इतिहासात एक संस्मरणीय पर्व ठरली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl