कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन उतेकर यांचा धडाकेबाज प्रचार; घरोघरी भेटी, आपुलकीच्या संवादातून मतदारांचा विश्वस
कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन उतेकर यांचा धडाकेबाज प्रचार; घरोघरी भेटी, आपुलकीच्या संवादातून मतदारांचा विश्वस
कुंभरोशी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन उतेकर यांच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली असून त्यांच्या धडाकेबाज प्रचारामुळे संपूर्ण गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिन उतेकर यांनी केवळ सभा आणि भाषणांपुरता प्रचार न ठेवता प्रत्यक्ष घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रत्येक घरात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतची मते ऐकून घेत ते शांतपणे, आपुलकीने चर्चा करत असल्याचे चित्र सध्या कुंभरोशी गणात पाहायला मिळत आहे.
या घरभेटींच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी उतेकर यांनी सखोल संवाद साधला. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, शेतीशी निगडित प्रश्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा, तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर मतदारांनी मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. या प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका मांडत विकासासाठी ठोस नियोजन असल्याचा विश्वास सचिन उतेकर यांनी नागरिकांना दिला.
प्रचारादरम्यान ग्रामस्थांकडून उतेकर यांना मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद, प्रेम आणि आपुलकी मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठांनी मार्गदर्शनपर शब्द देत “गावच्या विकासासाठी तुमच्यासारख्या तरुण नेतृत्वाची गरज आहे” असा विश्वास व्यक्त केला. महिलांनीही सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करत आपल्या अपेक्षा मांडल्या असून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन उतेकर यांनी दिले.
साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि लोकांशी थेट संपर्क हे सचिन उतेकर यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत असून त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. कुंभरोशी गणाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला. घरोघरी भेटी, संवादातून निर्माण झालेली आपुलकी आणि विश्वास यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला कुंभरोशी गणात नवे बळ मिळाले असून ही निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे.
Comments
Post a Comment