अवैध जंगल सफारीचा पर्दाफाश; भिलार–मेढा रोडवरील गुलाब पॉईंट व तळेमाळ दारिपॉईंट येथे पर्यटकांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष
अवैध जंगल सफारीचा पर्दाफाश; भिलार–मेढा रोडवरील गुलाब पॉईंट व तळेमाळ दारिपॉईंट येथे पर्यटकांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष
पाचगणी प्रतिनिधी –
भिलार ते मेढा रोडवरील गुलाब पॉईंट तसेच तळेमाळ येथील मंदिराजवळील बन दारिपॉईंट परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध जंगल सफारीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही हॉटेल व्यावसायिकांशी संगनमत करून जुना, भंगारात काढलेला व स्क्रॅप झालेला वाहनसाठा बाहेरून आणला जात असून, केवळ रंगरंगोटी करून या गाड्या बेकायदेशीरपणे जंगल सफारीसाठी वापरल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या गाड्यांकडे कोणतीही अधिकृत वनपरवानगी, आरटीओ मान्यता, फिटनेस प्रमाणपत्र किंवा विमा नसतानाही दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांना जंगलात नेले जात आहे.
या जंगल परिसरात गवे, बिबटे, अस्वल यांसारखे हिंसक वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. अशा परिस्थितीत कोणतीही सुरक्षितता उपाययोजना, प्रशिक्षित चालक, मार्गदर्शक किंवा संरक्षण व्यवस्था नसताना पर्यटकांना जंगलात नेणे म्हणजे त्यांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल उपस्थित होत असून, वनविभाग आणि आरटीओ प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अवैध सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची ना नियमित तपासणी होते, ना त्यांचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड आहे. अपघात झाल्यास किंवा जीवितहानी घडल्यास नुकसानभरपाई, विमा किंवा कायदेशीर जबाबदारी निश्चित करणे अत्यंत अवघड ठरणार आहे. तरीदेखील काही हॉटेल व्यावसायिक थेट पर्यटकांची बुकिंग करून या अवैध सफारीकडे वळवत असून, यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचेही बोलले जात आहे.
या प्रकारामुळे केवळ पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असे नव्हे, तर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संतुलनालाही गंभीर धोका पोहोचत आहे. अनधिकृत वाहनांची वर्दळ, आवाज, धूर व मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास बिघडत असून, भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध जंगल सफारीवर तात्काळ बंदी घालावी, संबंधित गाड्या जप्त कराव्यात, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच यात सहभागी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत आणि एखादी अप्रिय घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभाग आणि आरटीओ प्रशासनावर राहील, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे संबंधित विभागांकडून गांभीर्याने लक्ष दिले जाते की नाही, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले असून, येत्या काही दिवसांत ठोस कारवाई होते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment