महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; विविध गणांमध्ये तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढतींमुळे राजकीय वातावरण तापले

महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; विविध गणांमध्ये तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढतींमुळे राजकीय वातावरण तापले

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून अर्ज माघारीनंतर विविध गण आणि गटांमधील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सभापतीपदाचे आरक्षण, प्रमुख राजकीय पक्षांची थेट ताकद आणि अपक्ष उमेदवारांची उपस्थिती यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. प्रचाराला वेग आला असून तालुक्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.

मेटागुताड गणातून पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण असल्याने येथील निवडणूक विशेष महत्त्वाची ठरली आहे. अर्ज माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला रमेश चोरमले, शिवसेनेच्या वैशाली संतोष जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या अमिना नदीम शारवान या तीन उमेदवार रिंगणात कायम राहिल्या आहेत. सभापतीपदाचा उमेदवार याच गणातून निश्चित होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष मेटगुताडकडे लागले असून प्रचारात विकासकामे, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले आहेत.

भिलार गण पंचायत समिती निवडणुकीतही अर्ज माघारीनंतर तिरंगी लढत निश्चित झाली आहे. शिवसेनेच्या पुनम निलेश गोळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना प्रवीण भिलारे आणि भाजपच्या सुप्रिया अनिल भिलारे या तीन महिला उमेदवारांमध्ये थेट सामना होत आहे. ग्रामविकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्न यावर प्रचार रंगताना दिसत असून भिलार गणातील ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

कुंभरोशी गणात पंचायत समितीसाठी पंचरंगी लढत निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन श्रीरंग उतेकर, भाजपचे सुरेश हरिभाऊ जाधव, शिवसेनेचे संजय हरिश्चंद्र मोरे तसेच अपक्ष म्हणून समीर मधुकर चव्हाण आणि सनी अशोक मोरे हे पाच उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. प्रमुख पक्षांसह दोन अपक्ष उमेदवार असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून ही लढत अधिकच चुरशीची आणि अनिश्चित ठरणार असल्याचे चित्र आहे.

तळदेव गणात अर्ज माघारीनंतर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय महादेव उतेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अभिषेक आत्माराम शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे संजय विठ्ठल शेलार आणि भाजपचे गोविंद देवजी सकपाळ हे चार उमेदवार आमनेसामने आहेत. चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र ताकद दाखवत असल्याने तळदेव गणातील निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक चर्चेच्या लढतींपैकी एक ठरत आहे.

दरम्यान, भिलार गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही तिरंगी लढत निश्चित झाली आहे. भाजपच्या रंजना संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चंदर केळगणे आणि शिवसेनेचे प्रदीप विठ्ठल चपटे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. पर्यटन, विकासकामे, मूलभूत सुविधा आणि स्थानिक समस्या हे मुद्दे प्रचारात ठळकपणे पुढे येत आहेत.

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट प्रचार सभा घेत वातावरण अधिकच तापवले आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विविध गण आणि गटांतील तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढतींमुळे महाबळेश्वर तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl