कोयना–सोळशी व कांदाटी विभागात शांततेत मतदानाला सुरुवात; तळदेव गटात तिरंगी तर कुंभरोशी गणात पंचरंगी लढत
कोयना–सोळशी व कांदाटी विभागात शांततेत मतदानाला सुरुवात; तळदेव गटात तिरंगी तर कुंभरोशी गणात पंचरंगी लढत
संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी -
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोयना–सोळशी आणि कांदाटी विभागात आज सकाळपासून सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून, नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस यंत्रणाही सतर्क आहे.
या विभागातून जिल्हा परिषदेच्या तळदेव गटासाठी एक उमेदवार, तर पंचायत समितीच्या तळदेव गण आणि कुंभरोशी गणातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. जिल्हा परिषद तळदेव गटासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत रंगली असून तिन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या गटाचा निकाल अत्यंत चुरशीचा होणार असल्याचे चित्र आहे.
पंचायत समितीच्या तळदेव गणात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना अशा चार प्रमुख उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहे. या गणात शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराला वेग आला होता आणि त्याचे प्रतिबिंब आज मतदान केंद्रांवरील गर्दीतून दिसून येत आहे.
कुंभरोशी गणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि दोन अपक्ष उमेदवार अशी पंचरंगी लढत होत असून या ठिकाणी निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. विविध मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसत आहेत.
एकूणच कोयना–सोळशी व कांदाटी विभागात शांततेच्या वातावरणात मतदान सुरू असून, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अंतिम निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment