कुंभरोशीला पाण्यासाठी वणवण, तर गटाराला अखंडपुरवठा — फुटलेल्या पाईपलाईनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
कुंभरोशीला पाण्यासाठी वणवण, तर गटाराला अखंडपुरवठा — फुटलेल्या पाईपलाईनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
कुंभरोशी प्रतिनिधी :
कुंभरोशी गावातील ग्रामस्थांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, दुसरीकडे गावातीलच पाईपलाईन फुटून तब्बल चोवीस तास गटारामध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची गंभीर घटना निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार गेले आठ ते दहा दिवस सुरू असतानाही ग्रामसेवक माळवे यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. अशा परिस्थितीत, फुटलेल्या पाईपलाईनमधून दररोज हजारो लिटर पाणी थेट गटारात वाहून जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, हाच जलपुरवठा गटातील तुटलेल्या पाईपलाईनमुळे नागरिकांना मिळणारे पाणी गटाराच्या सांडपाण्याच्या संपर्कात येत असल्याने ते पिण्यासाठी वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कुंभरोशी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, संभाव्य जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवणे आणि दूषित पाणीपुरवठा रोखणे या दोन्ही बाबींवर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना, संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले नसल्याचे सांगितले जात आहे. काही नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन परिस्थिती दाखवून दिली असतानाही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी गावात तीव्र असंतोष पसरला असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यास संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कुंभरोशी गावाला स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment