पाचगणीच्या टेबललँडवरील तलाव नूतनीकरणास प्रारंभ; पर्यटन, पर्यावरण व जलसंधारणाला नवी ऊर्जा
✍️महेश ननावरे,
पाचगणी प्रतिनिधी :
निसर्गरम्य पाचगणी येथील प्रसिद्ध टेबललँड परिसरातील तलावाच्या नूतनीकरण व गळती थांबविण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ नगरपालिकेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, राजेंद्र पार्टे, महेश खांडके, अनिता चोपडे, माधुरी कासुर्डे, विमल भिलारे, अमृता गोळे, अक्षय बगाडे, गणेश कासुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाचगणी येथील टेबललँडवरील तलावाचे नूतनीकरण व गळती काढण्याचे काम पर्यटनाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत-दोन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असून, त्यासाठी नगरपालिकेला ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. हा निधी मिळवण्यासाठी माननीय मकरंद आबा पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचे मनोगत शेखर कासुर्डे यांनी व्यक्त केले.
पाचगणी परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवून गळती थांबविण्यात आल्यास पावसाळ्यात साठवलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहणार आहे. त्यामुळे टेबललँडसारख्या उंचावरील भागात पाण्याची उपलब्धता वाढून त्याचा फायदा वन्यजीव, पक्षी तसेच परिसरातील वनस्पतींना होणार आहे. टेबललँड हा विस्तीर्ण पठारी भाग असल्याने येथे पाणी साठल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढेल आणि त्याचा थेट परिणाम पाचगणी शहर तसेच पायथ्याच्या गावांच्या भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यावर होणार आहे.
तलाव पाण्याने भरलेला असल्यास तो पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. यामुळे पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक घोडेवाले, पर्यटन मार्गदर्शक (गाईड्स) तसेच छोट्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. पाण्यामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल, ज्यामुळे फोटोशूट आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही हा भाग अधिक लोकप्रिय ठरणार आहे.
उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची तीव्र टंचाई जाणवते, त्या काळात हा तलाव पशू-पक्ष्यांसाठी जीवनदान ठरणार आहे. आर्द्रता टिकून राहिल्यामुळे पठारावरील दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनास मदत होऊन जैवविविधतेचे जतन होईल. तसेच योग्य पद्धतीने नूतनीकरण झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग नियंत्रित राहून पावसाळ्यात होणारी मातीची धूप कमी होण्यासही मदत मिळणार आहे.
या कामाची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर मिलिंद कणसे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, एक वर्षाच्या कालावधीत हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
“थोडक्यात सांगायचे तर या प्रकल्पामुळे पाचगणीच्या वैभवात निश्चितच भर पडेल आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी केले. नागरिक आणि पर्यटकांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment