सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; सदस्य अज्ञातस्थळी हलवले
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; सदस्य अज्ञातस्थळी हलवले
सातारा प्रतिनिधी:
सातारा जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अध्यक्षपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तीव्र सत्तास्पर्धा निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेचे नेमके गणित कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले असून, संभाव्य फूट टाळण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना सोमवारी रात्री अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्हा परिषदेत एकूण ६५ जागांपैकी महायुतीने तब्बल ६३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये भाजपाला सर्वाधिक २७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २१ जागा, शिवसेना (शिंदे गट) १५ जागा, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागा मिळाल्या आहेत. मात्र महायुतीतील कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने अध्यक्षपदासाठी अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. तिन्ही पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केल्यामुळे सत्ता वाटपाचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे.
निकालानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून, संभाव्य आघाडीच्या शक्यतांवर विचारविनिमय सुरू झाला आहे. त्याचवेळी भाजपनेही स्वतंत्रपणे दोन्ही पक्षांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘काहीही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार’ असा ठाम दावा केला, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘देवेंद्र है तो सब मुमकिन है’ असे विधान करत भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
या घडामोडींमुळे सावध झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या सदस्यांना सोमवारी रात्रीच सहलीच्या नावाखाली अज्ञातस्थळी रवाना केले. संभाव्य पक्षांतर्गत फूट, अपक्षांची भूमिका आणि ऐनवेळी बदलणारी गणिते यामुळे सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील आणि शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे संकेत दिले आहेत.
एकीकडे भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा करत अध्यक्षपदावर ठाम आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनाही आपल्या संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्पर्धा दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment