अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; ९ फेब्रुवारीचा वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन
अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; ९ फेब्रुवारीचा वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव, कार्यक्रम अथवा समारंभ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत, शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावू नयेत तसेच कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन त्यांनी राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना केले आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याला अपूरणीय क्षती सहन करावी लागली आहे. या दु:खातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. व्यक्तिगत पातळीवर मी माझा जिव्हाळ्याचा सहकारी आणि मित्र गमावला असून, या घटनेने मन अत्यंत व्यथित झाले आहे. दादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात आपण सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या शोकाकुल वातावरणात वाढदिवस साजरा करणे, जल्लोष करणे अथवा कोणतेही सोहळे आयोजित करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, सत्कार, फुलांचे हार, पुष्पगुच्छ, बॅनर किंवा होर्डिंग्ज लावू नयेत, अशी स्पष्ट विनंती त्यांनी सर्वांना केली आहे.
राज्यातील राजकीय, सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला जात असून, एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शोककाळात साधेपणा, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचा आदर्श त्यांनी घालून दिल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment