कुंभरोशी गणातील निवडणूक वाद थेट न्यायालयात; संजय मोरे विजयी झाल्यानंतर समीर चव्हाण यांची निवडणूक याचिका, २७ फेब्रुवारीला सुनावणी

 कुंभरोशी गणातील निवडणूक वाद थेट न्यायालयात; संजय मोरे विजयी झाल्यानंतर समीर चव्हाण यांची निवडणूक याचिका, २७ फेब्रुवारीला सुनावणी

वाई / महाबळेश्वर (प्रतिनिधी) : 

महाबळेश्वर पंचायत समिती अंतर्गत कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीने आता थेट न्यायालयीन वळण घेतले असून, प्रत्यक्ष निवडणुकीत संजय हरिश्चंद्र मोरे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे. उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळल्यानंतर तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर समीर मधुकर चव्हाण यांनी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे.

बिरवाडी (ता. महाबळेश्वर) येथील रहिवासी समीर मधुकर चव्हाण यांनी २२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती महाबळेश्वरचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संजय मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवले होते. तक्रारीत संजय मोरे हे ‘अशोका मजूर संस्था’ या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष असून त्यांनी शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची अनेक कंत्राटे घेतल्याने ते थेट सरकारी कंत्राटदार ठरतात व त्यामुळे लोकप्रतिनिधी होण्यासाठी अपात्र ठरतात, असा दावा करण्यात आला होता. याशिवाय शासनाची उप-कंत्राटे घेतल्याचेही नमूद करत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

तक्रारीत पुढे संजय मोरे यांच्यावर काही गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याचा उल्लेख करत ही बाब उमेदवारी अर्जात योग्य प्रकारे जाहीर न केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर बँकेचे कर्ज असतानाही ही आर्थिक माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचे नमूद करून, उमेदवारी अर्जात संपूर्ण व सत्य माहिती न दिल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व कारणांवरून संजय मोरे यांचा उमेदवारी अर्ज तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी समीर चव्हाण यांनी केली होती.

दरम्यान, संजय मोरे यांचे प्रतिनिधी सुभाष करंडे यांनी या तक्रारीसंदर्भात वकिलामार्फत सविस्तर उत्तर दाखल केल्याचे स्पष्ट केले होते. सर्व बाजूंचा विचार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समीर चव्हाण यांचे अपील फेटाळत संजय मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष मतदानात संजय मोरे हे कुंभरोशी गणातून विजयी झाले. मात्र निकालानंतरही वाद शमला नसून, संतप्त झालेल्या समीर चव्हाण यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या निवडणूक याचिकेचा CNR क्रमांक MHST190001272026 असून दाखल क्रमांक Elec.Petn./48/2026 आणि नोंदणी क्रमांक Elec.Petn./1/2026 असा आहे. ही याचिका २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल करण्यात आली असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम १६, २७ व ५८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संजय हरिश्चंद्र मोरे, वैशाली राजमाने तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील पेंडसे चैतन्य केशव यांनी बाजू मांडली आहे.

या प्रकरणाची पहिली सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी पार पडली असून सध्या प्रकरणाची स्थिती ‘नोटीस प्रतीक्षा’ अशी आहे. जिल्हा न्यायाधीश-१, वाई यांच्या न्यायालयात या प्रकरणावर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, निवडणुकीत विजय मिळवूनही संजय मोरे यांना न्यायालयीन लढतीला सामोरे जावे लागत असल्याने कुंभरोशी गणासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, उमेदवारी अर्जातील माहितीची सत्यता आणि कायद्याची अंमलबजावणी यावर नव्याने प्रश्न उपस्थित झाले असून, न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl