कुंभरोशीत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ! तुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीकडून गंभीर दुर्लक्ष
कुंभरोशीत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ! तुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीकडून गंभीर दुर्लक्ष
कुंभरोशी प्रतिनिधी –
कुंभरोशी ग्रामपंचायतमार्फत गावाला करण्यात येणारा पाणीपुरवठा सध्या अत्यंत चिंताजनक अवस्थेत असून तुटलेल्या व गळती होणाऱ्या पाईपलाईनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी तुटलेली असून, काही भागांत पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तरीही याची दुरुस्ती न करता त्याच अवस्थेतून दूषित पाणी ग्रामस्थांच्या घराघरांत पोहोचविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तुटलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणी गटारातील सांडपाणी, चिखल, माती आणि कचरा मिसळून पाणी थेट पुरवठा लाईनमध्ये जात आहे. परिणामी ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि आरोग्यास अत्यंत घातक पाणी वापरण्यास भाग पाडले जात आहे. या दूषित पाण्यामुळे गावात पोटदुखी, जुलाब, उलटी, ताप, सर्दी अशा आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल न घेता केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाणीपुरवठा ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी असताना, अशा प्रकारचे दुर्लक्ष हे अत्यंत निषेधार्ह असून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
गावातील काही वाड्यांमध्ये अनेक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहतो, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने दूषित पाणी येते. त्यामुळे महिलांना दूरवरून पिण्यायोग्य पाणी आणावे लागत असून दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शाळकरी मुले, शेतकरी, मजूर वर्ग आणि वृद्ध नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच संबंधित विभागाने त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. कुंभरोशी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे अत्यावश्यक बनले आहे.
Comments
Post a Comment