“शेतकऱ्याच्या लेकीचा विजय! कुसुंबी गटात कविता ओबळेंची ऐतिहासिक झेप”
“शेतकऱ्याच्या लेकीचा विजय! कुसुंबी गटात कविता ओबळेंची ऐतिहासिक झेप”
मेढा प्रतिनिधी :
कुसुंबी गटातील अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या कविता ओबळे यांनी अवघ्या १८० मतांच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला. भाजपच्या अर्चना राजणे यांचा पराभव करत त्यांनी कुसुंबी गटात नवे राजकीय समीकरण उभे केले. “काटे की टक्कर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढतीचा निकाल जावली तालुक्याच्या राजकारणात धक्कादायक मानला जात आहे.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरस टोकाला पोहोचलेली दिसून आली. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत अखेर १८० मतांच्या आघाडीने कविता ओबळे यांच्या पारड्यात विजय पडताच समर्थकांमध्ये जल्लोष उसळला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कविता ओबळे यांच्या या यशाने ग्रामीण मतदारांनी विकासाला आणि विश्वासार्ह नेतृत्वाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले.
या विजयामागे संपर्क प्रमुख एकनाथ ओबळे यांचे संघटन कौशल्य आणि सततचा जनसंपर्क निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. गावोगावी भेटी, कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संपर्क आणि प्रत्येक हाकेला तत्पर प्रतिसाद देणाऱ्या नेतृत्वामुळे शिवसेनेला कुसुंबी गटात बळकटी मिळाली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळालेल्या पाठिंब्याचाही या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
पंचायत समिती गणातही शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली असून आंबघर गणातून आतिष कदम आणि कुसुंबी गणातून सुनिता ओबळे यांची निवड झाल्याने पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे. या निकालामुळे जावली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर कविता ओबळे यांच्यासमोर मोठी जबाबदारी उभी आहे. कुसुंबी गटातील सिंचनाच्या समस्या, पाण्याची टंचाई, रस्ते, तसेच मूलभूत सुविधा सुधारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. “जनतेने दिलेला विश्वास अबाधित ठेवत सर्वांगीण विकासाला गती देऊ,” असा शब्द त्यांनी विजयानंतर दिला.
कुसुंबी गटातील हा निकाल केवळ एका उमेदवाराचा विजय नसून ग्रामीण जनतेच्या आशा-अपेक्षांचा विजय मानला जात आहे. शेतकऱ्याच्या लेकीने मिळवलेले हे यश जावलीच्या राजकारणात नवा अध्याय लिहून गेले आहे.
Comments
Post a Comment