प्रतापगडावर शिवजयंतीचा भव्य उत्सव : रक्तदान, सांस्कृतिक कार्यक्रम व सेवाभावातून मानवतेचा जागर


प्रतापगडावर शिवजयंतीचा भव्य उत्सव : रक्तदान, सांस्कृतिक कार्यक्रम व सेवाभावातून मानवतेचा जागर

प्रतापगड प्रतिनिधी —

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले प्रतापगड येथे सातारा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कुंभरोशी, प्रतापगड व्यवस्थापन समिती, पर्यटक गाईड सामाजिक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्साह, भक्तीभाव आणि सेवावृत्तीच्या वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला.

सकाळी ७ वाजता श्री भवानी माता मंदिरात मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद यांच्या शुभहस्ते भवानी मातेचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ वाजता भवानी माता महापूजा संपन्न झाली. सकाळी ९.३० वाजता भवानी माता मंदिरासमोर मा. सरपंच, ग्रामपंचायत कुंभरोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३५ वाजता पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद यांच्या शुभहस्ते पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे सामूहिक गायन, पोवाडा सादरीकरण, शिवचरित्रपर व्याख्यान तसेच शालेय विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत किल्ले प्रतापगड येथे ठराव समितीची सभा पार पडली.

शिवजयंतीच्या पावन पर्वावर सामाजिक बांधिलकी जपत प्रतापगड परिसरात मावळ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे रक्तदान शिबिर भवानी माता मंदिर परिसर, प्रतापगड तसेच श्री क्लिनिक, डॉ. महेंद्र भिलारे, कुंभरोशी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत एकाच वेळी पार पडले. या उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे बेल एअर ब्लड सेंटर, वाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजासाठी जीवनदायी ठरणारा हा उपक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य संजय मोरे, कुंभरोशी ग्रामपंचायत माजी सरपंच कांचन सावंत, गटविकास अधिकारी विजय विभुते यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी विद्यालय, कुंभरोशी येथील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दरे येथील विद्यार्थ्यांनी काठी नृत्य सादर केले, तर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे व अन्य कलांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रतापगड व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश गायकवाड गुरुजी यांनी केले.

शिस्त, नियोजन, भक्तीभाव आणि सेवाभाव यांचा सुरेख संगम असलेला हा शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. शिवरायांच्या विचारांना कृतीत उतरवून समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम सर्व उपस्थितांसाठी स्मरणीय ठरला. ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या गजरात किल्ले प्रतापगड परिसर दुमदुमून गेला आणि हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl