महाबळेश्वरचा कौल : शिवसेना–राष्ट्रवादीचा दबदबा कायम, भाजपाला धक्का
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत तालुक्यातील राजकीय पकड अधिक मजबूत केली आहे. एक गट व दोन गण अशा प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवत दोन्ही पक्षांनी सत्ता संतुलन आपल्या बाजूने राखले.
जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चार जागांसाठीची मतमोजणी गिरीस्थान प्रशालेच्या प्रांगणात निवडणूक अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचे समर्थक व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक फेरीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तळदेव गटात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. या चुरशीच्या लढतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजित रामचंद्र संकपाळ यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे कट्टर समर्थक व पंचायत समितीचे माजी सभापती संजय गायकवाड यांचा तब्बल तीन हजार मतांनी धक्कादायक पराभव करत मोठा विजय मिळवला. संकपाळ यांना ७६७३, तर गायकवाड यांना ४६७३ मते मिळाली. या गटातील पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरही शिवसेनेने वर्चस्व राखत तालुक्यातील आपली ताकद अधोरेखित केली.
तळदेव गटातील कुंभरोशी गणात पंचरंगी लढत असली तरी खरी चुरस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होती. शिवसेनेचे संजय हरिश्चंद्र मोरे यांनी राष्ट्रवादीचे सचिन उतेकर यांचा ३३४ मतांनी पराभव केला. मोरे यांना २७७२, तर उतेकर यांना २४३८ मते मिळाली. तळदेव गणात एकतर्फी झालेल्या लढतीत शिवसेनेचे संजय विठ्ठल शेलार यांनी राष्ट्रवादीचे संजय उतेकर यांचा २०१० मतांनी दणदणीत पराभव करत आपला दबदबा सिद्ध केला. शेलार यांना ४२८२, तर उतेकर यांना २२७२ मते मिळाली.
भिलार गटावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व यंदाही कायम राहिले. राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये झालेल्या थेट लढतीत राष्ट्रवादीने गटासह दोन्ही गण जिंकत भाजपाचा दारुण पराभव केला. गटात राष्ट्रवादीचे संजय चंदर केळगणे यांनी भाजपाच्या रंजना कदम यांचा ६०९३ मतांनी पराभव केला. केळगणे यांना ८७८८, तर कदम यांना २६९५ मते मिळाली. भिलार गणात राष्ट्रवादीच्या वंदना प्रवीण भिलारे यांनी भाजपाच्या सुप्रिया भिलारे यांचा ४१४४ मतांनी पराभव केला. वंदना भिलारे यांना ५१३६, तर सुप्रिया भिलारे यांना केवळ ९९२ मते मिळाली.
यंदा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव असल्याने मेटगुताड गणातील लढतीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला रमेश चोरमले यांनी भाजपाच्या अमिना शारवान यांचा १०८६ मतांनी पराभव केला. चोरमले यांना २७८४, तर शारवान यांना १६९८ मते मिळाली.
तालुक्याच्या भौगोलिक रचनेनुसार पूर्व भाग हा स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे सधन, तर पश्चिम भाग अतिवृष्टीमुळे विकासापासून काहीसा मागे राहिलेला आहे. पश्चिम भागातील तापोळा, कोयना व कांदाटी परिसरात रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास झाल्याने शिवसेनेच्या विकासात्मक भूमिकेला मतदारांनी मोठा पाठिंबा दिला, तर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे, निवडून आलेले सर्व उमेदवार हे नवीन चेहरे असून, त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. नव्या नेतृत्वाकडून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
निवडून आलेले उमेदवार :
अजित रामचंद्र संकपाळ – शिवसेना (तळदेव गट)
संजय चंदर केळगणे – राष्ट्रवादी काँग्रेस (भिलार गट)
शकुंतला रमेश चोरमले – राष्ट्रवादी काँग्रेस (मेटगुताड गण)
संजय हरिश्चंद्र मोरे – शिवसेना (कुंभरोशी गण)
संजय विठ्ठल शेलार – शिवसेना (तळदेव गण)
वंदना प्रवीण भिलारे – राष्ट्रवादी काँग्रेस (भिलार गण)
Comments
Post a Comment