मतदानाच्या रणधुमाळीत महाबळेश्वर तालुका; उत्साहात मतदान प्रक्रियेला सुरुवात
मतदानाच्या रणधुमाळीत महाबळेश्वर तालुका; उत्साहात मतदान प्रक्रियेला सुरुवात
कुंभरोशी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर तालुक्यात सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या तासापासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागलेली पाहायला मिळाली. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून संपूर्ण तालुक्यात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पंचायत समितीच्या कुंभरोशी गणासाठी पंचरंगी लढत होत असून पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर जिल्हा परिषदेच्या तळदेव गटातून तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने येथे तिरंगी सामना रंगला आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा वेग शिगेला पोहोचला होता. प्रचार सभांमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले होते.
या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यात जाहीर सभा घेऊन प्रचार केल्याने वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले होते. प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला, तर मतदारांमध्येही चर्चांना उधाण आले होते.
आजच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व मतदान केंद्रांवर शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिस बंदोबस्त, अधिकारी-कर्मचाऱ्यांची तैनाती आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
दरम्यान, कोण उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकशाहीच्या या पर्वात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment