बिग ब्रेकिंग : महाबळेश्वर तालुक्यावर शिवसेनेचा भगवा – तळदेव गट व कुंभरोशी गणासह तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा दणदणीत विजय
बिग ब्रेकिंग : महाबळेश्वर तालुक्यावर शिवसेनेचा भगवा – तळदेव गट व कुंभरोशी गणासह तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा दणदणीत विजय
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीअखेर राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले असून तळदेव गट जिल्हा परिषद, कुंभरोशी गण पंचायत समिती आणि तळदेव गण पंचायत समिती या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत तालुक्यावर आपला भगवा फडकावला आहे. अत्यंत चुरशीच्या, अटीतटीच्या आणि बहुप्रतीक्षित लढतीनंतर अखेर शिवसेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला आहे.
तळदेव गणात पंचायत समितीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शेलार यांनी 4282 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय उतेकर यांना 2272 मते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अभिषेक शिंदे यांना 186 मते तर भाजपचे गोविंद सकपाळ यांना 396 मते मिळाली. मोठ्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे तळदेव गणात शिंदे गटाचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
जिल्हा परिषद तळदेव गटातही शिवसेना शिंदे गटाचे अजित संकपाळ यांनी 7673 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड यांचा 3000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. संजय गायकवाड यांना 4673 मते तर भाजपचे सुभाष सोंडकर यांना 557 मते मिळाली. या निकालामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.
दरम्यान, कुंभरोशी गण पंचायत समितीत शिवसेनेचे संजय मोरे यांनी 2772 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन उतेकर यांना 2019 मते, भाजपचे सुरेश जाधव यांना 268 मते, अपक्ष समीर चव्हाण यांना 180 तर अपक्ष सनी मोरे यांना 87 मते मिळाली. 753 मतांच्या मोठ्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे कुंभरोशी गणात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळदेव गट जिल्हा परिषद, तळदेव गण पंचायत समिती आणि कुंभरोशी गण पंचायत समिती या तिन्ही ठिकाणी मिळालेल्या घवघवीत विजयामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर शिवसेनेचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच तालुकाभर शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
या ऐतिहासिक विजयामुळे महाबळेश्वर तालुक्यातील आगामी सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असून तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. दरम्यान, भिलार गट जिल्हा परिषद उमेदवार, भिलार गण पंचायत समिती उमेदवार तसेच मेटगुताड गण पंचायत समिती उमेदवार यांचे अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचे असून त्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment