शाळा क्रमांक १ मागील सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेवर तोडगा; नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक राहुल पिसाळ व स्वच्छता विभागाची तत्पर कारवाई मोबाईल टॉयलेटची तात्पुरती व्यवस्था करून नागरिकांना दिलासा; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
शाळा क्रमांक १ मागील सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेवर तोडगा; नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक राहुल पिसाळ व स्वच्छता विभागाची तत्पर कारवाई
मोबाईल टॉयलेटची तात्पुरती व्यवस्था करून नागरिकांना दिलासा; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
गेल्या काही दिवसांपासून शाळा क्रमांक १ च्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. दुर्गंधी, अस्वच्छता व गैरसोयीमुळे स्थानिक नागरिक, शाळेतील विद्यार्थी, महिला तसेच परिसरातील व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने याबाबत वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात येत होत्या.
नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राहुल पिसाळ यांनी तातडीने पुढाकार घेतला. स्वच्छता विभागाचे अधिकारी प्रमोद कुंभार यांच्याशी पत्रव्यवहार करून मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात आली. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादामुळे मेढा येथून मोबाईल टॉयलेट आणून अल्पावधीतच कार्यान्वित करण्यात आले.
नागरिकांना दिलासा
मोबाईल टॉयलेट सुरू झाल्याने परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूलभूत स्वच्छता सुविधांचा लाभ मिळाल्याने परिसरातील वातावरणातही सुधारणा झाली आहे. विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांना व महिलांना या व्यवस्थेचा मोठा फायदा झाला आहे.
तथापि, ही तात्पुरती व्यवस्था असल्याने कायमस्वरूपी शौचालय सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जुन्या शौचालयाची दुरुस्ती करणे अथवा नवीन आधुनिक सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
स्थानिक नागरिक संतोष कांबळे यांनी या कार्यवाहीचे कौतुक करताना सांगितले, "सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक राहुल पिसाळ व स्वच्छता विभागाचे अधिकारी प्रमोद कुंभार यांनी पत्रव्यवहार करून तातडीने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केल्याने परिसरातील दुर्गंधी व गैरसोय दूर झाली. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे संवेदनशीलपणे पाहणारी ही कार्यवाही निश्चितच कौतुकास्पद आहे."
नागरिक प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या समन्वित प्रयत्नांमुळे सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्येवर तात्पुरता तोडगा निघाला असला, तरी कायमस्वरूपी उपायांसाठी प्रशासनाने लवकरच योजना आखणे अपेक्षित आहे.
Comments
Post a Comment