“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” — उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५६ वा शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा उत्साहात
“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” — उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५६ वा शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा उत्साहात
पोलादपूर | प्रतिनिधी
“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” असा अढळ निर्धार व्यक्त करत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५६ व्या शौर्यदिन व पुण्यतिथीनिमित्त उमरठ येथे भव्य सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शिवभक्तांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर करण्यात आला.
दि. १० फेब्रुवारी रोजी अष्टमीनिमित्त सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास महाअभिषेक करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या हरिपाठाचे भक्तिपूर्ण सादरीकरण करण्यात आले. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
आज सकाळी सुभेदार तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीस्थळी विधीवत महाअभिषेक करण्यात आला. हा विधी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते पार पडला. यानंतर माजी सरपंच इंद्रजीत कळंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेलार मामा व नव्या तानाजी मालुसरे यांच्या समाधीवर सरपंच जयराम मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मूर्तीस नरवीर युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल मालुसरे व शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर शिवशाहीर वैभव घरत यांनी आपल्या स्फूर्तिदायी पोवाड्यातून तानाजींच्या अद्वितीय पराक्रमाचे जिवंत चित्र उभे केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये स्वराज्याभिमानाची भावना जागृत झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण उमरठ नगरी शिवमय झाली.
मा. मंत्री भरतशेठ गोगावले व अदिती ताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव समिती, रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामदास कळंबे, उत्सव समितीचे सचिव मारुती कळंबे, माजी सरपंच चंद्रकांत गजानन कळंबे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
या शौर्यदिन सोहळ्यानिमित्त उमरठ नगरीत शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. हजारो भाविकांनी उपस्थित राहून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण परिसरात शिवभक्ती, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर अनुभवायला मिळाला.
Comments
Post a Comment