कत्तलीसाठी नेलेले दोन बैल वाचले; तरुणाच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तत्परतेने मिळाले जीवनदान
कत्तलीसाठी नेलेले दोन बैल वाचले; तरुणाच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तत्परतेने मिळाले जीवनदान
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी गावच्या हद्दीत कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नेले जात असलेल्या दोन बैलांना एका तरुणाच्या सतर्कतेमुळे आणि महाबळेश्वर पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे जीवनदान मिळाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणामुळे परिसरात पशुप्रेमी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, बेकायदेशीर जनावर वाहतुकीविरोधातील पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील रहिवासी प्रसाद साळुंखे हे ११ फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या मित्रांसोबत हरोशी गाव परिसरातील हॉटेल सह्याद्री येथे जेवणासाठी गेले होते. रात्री सुमारे बारा वाजता जेवण आटोपून महाबळेश्वरकडे परत येत असताना, हरोशी गावच्या हद्दीतील हॉटेल निसर्गसमोर एक पिकअप गाडी संशयास्पदरीत्या उभी असलेली त्यांच्या निदर्शनास आली. त्या वाहनातून जनावरांच्या हंबरड्याचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच, प्रसाद यांनी तात्काळ गाडी जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी पिकअपमध्ये दोन बैल अत्यंत कोंडलेल्या अवस्थेत कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळून आले.
प्रसाद यांनी क्षणाचाही विलंब न करता याबाबत महाबळेश्वर पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच रात्रगस्त पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिकअप चालक राहुल साळुंखे व त्याच्यासोबत असलेल्या राहुल शिंदे यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे जनावर वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच हे बैल नेमके कुणाकडे व कोणत्या उद्देशाने नेले जात होते, याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.
या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ दोघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. जप्त करण्यात आलेले दोन बैल सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा येथील वेळे परिसरातील गोशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात बेकायदेशीर पशुवाहतुकीविरोधात कठोर कारवाईची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका जागरूक तरुणाच्या सतर्कतेमुळे दोन मुक्या जीवांना मिळालेले जीवनदान हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद घटनांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment