“धनशक्ती नव्हे, माणुसकी जिंकते!” – कुंभरोशी गणात ‘पप्पू’ सचिन उतेकरांसाठी भावनिक लढा
कुंभरोशी प्रतिनिधी -
महाबळेश्वर पंचायत समितीतील कुंभरोशी गणाची निवडणूक यावेळी केवळ उमेदवाराची नाही, तर माणुसकी, विश्वास आणि विकासाच्या मूल्यांची परीक्षा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन श्रीरंग उतेकर उर्फ पप्पू हे नाव आज कुंभरोशी गणातील २२ गावांमध्ये सामान्य जनतेच्या ओठांवर आहे. कारण हे नाव केवळ राजकारणाशी नाही, तर प्रत्येक संकटात धावून येणाऱ्या माणसाशी जोडलेले आहे.
कोरोनाचा भयावह काळ असो वा अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेली गावे, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सर्वात आधी पुढे आले ते सचिन उतेकर. कुठलाही गाजावाजा न करता, कुठलाही भेदभाव न ठेवता त्यांनी गरजूंच्या घरापर्यंत मदतीचा हात पोहोचवला. त्यामुळेच आज ते केवळ उमेदवार नाहीत, तर प्रत्येक कुटुंबातील आपला माणूस बनले आहेत.
कुंभरोशी गणातील विकास हा कुण्या एका व्यक्तीचा दावा नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, नामदार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सहकार्याने आणि राजू शेठ राजपुरे यांच्या सोबतीने सचिन उतेकर यांनी अनेक विकासकामांना दिशा दिली. रस्ते, पाणी, संकटग्रस्तांसाठी मदत – या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आज गावोगावचे नागरिक आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही समस्येसाठी सर्वात आधी नाव घेतलं जातं ते “पप्पू”चं. व्यवसायिक असतानाच समाजकारणाची खरी ओढ असलेले हे नव नेतृत्व आज विश्वासाचा कणा बनले आहे. मोठ्या धनशक्तीसमोर उभा असलेला हा संघर्ष पैशाचा नाही, तर माणुसकीचा आहे.
आज कुंभरोशी गणातील मतदारांसमोर एक भावनिक आव्हान उभं आहे – संकटात साथ देणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं की केवळ आश्वासनांच्या पोकळ शब्दांवर विश्वास ठेवायचा? विकास, विश्वास आणि माणुसकीचा झेंडा हाती घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन उतेकर यांना विजयी करण्यासाठी जनतेचा कौल आता निर्णायक ठरणार आहे.
Comments
Post a Comment