श्री झोळाई माता यात्रौत्सवाला कुमठे गावात भक्ती-उत्साहाचे वातावरण; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
॥ श्री झोळाई माता यात्रौत्सवाला कुमठे गावात भक्ती-उत्साहाचे वातावरण; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ॥
कुमठे प्रतिनिधी –
श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुमठे गावात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री झोळाई माता यात्रौत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे. सामाजिक व नैतिक मूल्यांची परंपरा जपणाऱ्या कुमठे गावातील ग्रामस्थांच्या वतीने या यात्रौत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमांनी हा उत्सव संपन्न होणार आहे.
यात्रौत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी देवीच्या अभिषेकाने होणार असून त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री भजन ग्रामस्थ मंडळ, कुमठे-कोंडोशी यांचे भजन कार्यक्रम होणार असून वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासून ‘श्री’ची पूजा व आरती, सायंकाळी मूर्ती बसविणे व काठी उभारणे, पारंपारिक गोंधळ, गोंधळी नैवेद्य व गोंधळी कथा असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत सकाळ-सायंकाळ आरतीसह वारकरी सांप्रदायिक मंडळ, कुमठे-कोंडोशी यांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवारी रात्री भव्य क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण, मान्यवरांचे स्वागत समारंभ तसेच प्रसिद्ध लोकनाट्य कलाकार अशोक भोसले धोंडेवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे. शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे छबिना व पालखी मिरवणूक, लळीत भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी पुन्हा लोकनाट्य तमाशा सादर होणार असून सायंकाळी यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.
श्री झोळाई माता यात्रौत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून ग्रामसंस्कृती, परंपरा व एकतेचे दर्शन घडवणारा सोहळा असल्याने भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेतील महत्त्वाच्या समारंभांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment