डांबरी रस्त्यावर काँक्रीटचा प्रयोग; K.L.N. कंपनीचा मनमानी कारभार उघड — लिंगमळा–महाबळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट दुरुस्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

डांबरी रस्त्यावर काँक्रीटचा प्रयोग; K.L.N. कंपनीचा मनमानी कारभार उघड — लिंगमळा–महाबळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट दुरुस्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

महाबळेश्वर प्रतिनिधी :

पर्यटन नगरी महाबळेश्वरकडे जाणारा लिंगमळा–महाबळेश्वर हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा डांबरी रस्ता सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यानंतर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली K.L.N. कंपनीकडून सुरू असलेला मनमानी व तांत्रिक नियमांना छेद देणारा कारभार आता उघडकीस आला आहे.

डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे हे डांबर व ठरावीक दर्जाच्या साहित्याने भरून दुरुस्त करणे आवश्यक असताना, संबंधित कंपनीकडून थेट रेडी मिक्स काँक्रीटचा वापर करून खड्डे बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या चुकीची असून, डांबरी रस्त्याच्या संरचनेशी काँक्रीटची सुसंगतता नसल्याने भविष्यात रस्ता अधिक खराब होण्याची आणि अपघातांची शक्यता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हा प्रकार निदर्शनास येताच ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शहर शिवसेनेच्या वतीने K.L.N. कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाब विचारत, रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. रस्त्याची दुरुस्ती ही तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकालीन, दर्जेदार आणि नियमबद्ध पद्धतीनेच व्हावी, अशी ठाम मागणी शिवसेनेने केली.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख श्री. राजाभाऊ गुजर आणि विभाग प्रमुख श्री. शंकर ढेबे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लिंगमळा–महाबळेश्वर रस्त्यावर सुरू असलेले नियमबाह्य व निकृष्ट काम सहन केले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित योग्य तांत्रिक निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

या भूमिकेला टॅक्सी चालक आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. टॅक्सी युनियनचे अध्यक्ष श्री. यशवंत (आप्पा) भिलारे यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघातांचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी श्री. अंकुश दादा बावळेकर, श्री. राजेश साळवी, श्री. शाहनवाज भाई खारखंडे, श्री. दिपक ताथवडेकर, श्री. आसिफ भाई महापुळे, श्री. अमोल साळुंखे, श्री. जितेश कुंभारदरे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तात्काळ ठोस व शाश्वत निर्णय घेण्याची मागणी केली.

पर्यटन हंगामाच्या तोंडावर लिंगमळा–महाबळेश्वर रस्त्याची अशी अवस्था राहिल्यास महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो आणि स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कंपनीने वेळकाढूपणा न करता त्वरित नियमांनुसार, दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करावी, अन्यथा ठाकरेंच्या शिवसेनेचा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl