स्ट्रॉबेरीसारखेच लालभडक राजकारण; भिलार–मेटगुताड गटांत निवडणुकीची धग तीव्र

स्ट्रॉबेरीसारखेच लालभडक राजकारण; भिलार–मेटगुताड गटांत निवडणुकीची धग तीव्र

महाबळेश्वर प्रतिनिधी –

स्ट्रॉबेरीसाठी देशभरात ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील भिलार जिल्हा परिषद गट, भिलार गण आणि मेटगुताड गणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिवाळ्यात लालभडक दिसणाऱ्या स्ट्रॉबेरीप्रमाणेच या परिसरातील राजकारणही दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून उमेदवारीच्या चर्चांनी वातावरण ढवळून निघाले आहे.

स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांचा प्रभाव असलेल्या भिलार जिल्हा परिषद गटात यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागू झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून संजय केळगणे यांचे नाव उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश सपकाळ राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चांना दिवसभर उधाण आले होते. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी अंतर्गत खलबते, इच्छुकांशी चर्चा आणि समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्व बाजूंनी सखोल विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भिलार गणामध्ये पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीकडून प्रवीण शेठ भिलारे यांच्या पत्नी वंदना भिलारे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे बाळासाहेब भिलारे यांची सून आणि नितीन भिलारे यांच्या पत्नी तेजस्विनी भिलारे यांना राष्ट्रवादीकडून डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा तालुकाभर पसरली आहे. बाळासाहेब भिलारे यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग दिवसभर तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली करत असल्याचे चित्र दिसून आले. या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेस कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेकडून कौशल्या संभाजी भिलारे आणि पूनम गोळे यांची नावे इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चेत असून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपने मात्र आपला उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याने राजकीय उत्सुकता अधिक वाढली आहे.

मेटगुताड गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश चोरमले यांच्या पत्नी यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गणात भाजप आणि शिवसेनेकडूनही उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असून योग्य वेळ साधून नावे जाहीर केली जातील, असे संकेत मिळत आहेत.

एकूणच भिलार आणि मेटगुताड परिसरात उमेदवारीची गणिते, नाराजी, पक्षांतर्गत संघर्ष आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे निवडणूकपूर्व वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या काही दिवसांत कोण कुठल्या बाजूला उभा राहतो आणि अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय चित्र कोणते वळण घेते, हे पाहणे महाबळेश्वर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl