खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते तांदूळनही व लामणवस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन; क्षेत्र महाबळेश्वरमध्ये विकास व सामाजिक उपक्रमांचा त्रिवेणी संगम
खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते तांदूळनही व लामणवस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन; क्षेत्र महाबळेश्वरमध्ये विकास व सामाजिक उपक्रमांचा त्रिवेणी संगम
क्षेत्र महाबळेश्वर (प्रतिनिधी) :
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांदूळनही व लामणवस्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ग्रामपंचायत श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या वतीने या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार मा. नितीन काका पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. पावसाळ्यात चिखल, वाहतुकीतील अडथळे व दैनंदिन गैरसोयींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे सुरक्षित व सुलभ दळणवळणाचा लाभ मिळणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. श्री. राजेंद्रशेठ राजपुरे, मा. सभापती श्री. संजुबाबा गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. श्री. प्रविणशेठ भिलारे, पंचायत समिती महाबळेश्वरचे गट विकास अधिकारी मा. श्री. विजय विभुते तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता मा. श्री. अजय देशपांडे यांची उपस्थिती लाभली. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कुटुंब पातळीवरील समृद्ध ग्रामस्पर्धा २०२६ चा उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच ग्रामपंचायत व हिलदारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. याच वेळी श्रीक्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच मा. श्री. सुनील सुरेश बिरामणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, क्षेत्र महाबळेश्वर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दूधशक्र योगाच्या मुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमास खासदार नितीन काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेवक प्रशांत रणपिसे यांनी केली तर आभार सरपंच सुनील बिरामणे यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. गणेश शेडगे व शिक्षक हजारे यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात रस्ता काँक्रीटीकरणासारख्या मूलभूत सुविधांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात असून शासनाच्या विविध अभियानांमधून ग्रामस्तरावर समृद्धी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले. विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक उपक्रम एकाच दिवशी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व सर्व आयोजकांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment