सूर्यग्रहण मौनी अमावस्येच्या सुवर्णस्मृतीला मानवंदना; श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भव्य ‘राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा’ भक्तिभावात संपन्न

सूर्यग्रहण मौनी अमावस्येच्या सुवर्णस्मृतीला मानवंदना; श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भव्य ‘राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा’ भक्तिभावात संपन्न

महाबळेश्वर प्रतिनिधी –

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संस्कारमूर्ती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला सूर्यग्रहण मौनी अमावस्येच्या दिवशी इ.स. १६६५ साली केली होती. या गौरवशाली आणि ऐतिहासिक घटनेला १८ जानेवारी २०२६ रोजी ३६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सुवर्णस्मृतीला मानवंदना देण्यासाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भव्य ‘राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

स्वराज्याची बीजे रुजविणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ या केवळ एक माता नसून संपूर्ण राष्ट्राच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनातील त्याग, शौर्य, संस्कार, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुण यांची उजळणी व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या सोहळ्यास इतिहास अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटनांचे प्रतिनिधी, युवक-युवती, शिवभक्त तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान महिलेला ‘राजमाता जिजाऊ सन्मान’ देऊन गौरविण्याची परंपरा या उपक्रमातून जपली जाते. यावर्षी सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू कु. आदिती गोपीचंद स्वामी हिला या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले. या सन्मानाच्या माध्यमातून समाजातील महिलांचे कर्तृत्व अधोरेखित करत त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमात शिवकालीन परंपरा जपणारे तसेच मराठ्यांच्या शौर्यगाथा उलगडणारे विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विशेष आकर्षण ठरलेले ‘फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात इतिहासाबद्दल अभिमान, आत्मसन्मान आणि प्रेरणा निर्माण केली. मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टीवर, राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांच्या मोलाच्या भूमिकेवर सखोल प्रकाश टाकला. आजच्या काळात महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातून आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्व आणि समाजभानाचे धडे घ्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ऐतिहासिक आणि पावन अशा क्षेत्र महाबळेश्वरच्या भूमीवर हा सोहळा पार पडल्याने कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभले. या सोहळ्यास इतिहास अभ्यासक मिलिंदजी एकबोटे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, महाबळेश्वर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शेठ शिंदे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे किसनशेठ भिलारे, युवा उद्योजक अमोल चोरमले, गुरेघरचे सरपंच रमेश चोरमले तसेच महाबळेश्वर नगरीचे सर्व नूतन नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाबळेश्वर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवरांनी आर्थिक, सामाजिक व स्वयंसेवी स्वरूपात मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सुनील बिरामणे यांनी आभारप्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक उपक्रमांमुळे शिवरायांचा व राजमाता जिजाऊंचा वैभवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl