मेटगुताड ग्रामपंचायतीचा डिजिटल क्रांतीकडे ठाम पाऊल; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून घरपोच दाखल्यांची सुविधा सुरू
मेटगुताड ग्रामपंचायतीचा डिजिटल क्रांतीकडे ठाम पाऊल; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून घरपोच दाखल्यांची सुविधा सुरू
मेटगुताड प्रतिनिधी :
मेटगुताड ग्रामपंचायतीने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल टाकत ‘डिजिटल ग्रामपंचायत’ या अभिनव उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन कसे उभे करता येते, याचे जिवंत उदाहरण मेटगुताड ग्रामपंचायतीने सादर केले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत ग्रामपंचायतीमार्फत आता प्रत्येक कुटुंबाला घरपोच सात प्रकारचे महत्त्वाचे दाखले सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, वेळ आणि खर्चाची बचत होणार असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
या डिजिटल उपक्रमाची औपचारिक सुरुवात दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. या दिवशी कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांचे डिजिटल मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच वारसाला थेट घरपोच स्वरूपात प्रदान करण्यात आले. हा क्षण ग्रामपंचायतीच्या डिजिटल प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भिकन बावळेकर, ग्रामपंचायत सदस्य, मयत व्यक्तीचे वारस, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैभव काळे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण प्रशासन अधिक गतिमान होणार असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकसेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मेटगुताड ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा डिजिटल प्रयोग इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment