उमेदवारीवर कोणालाही शब्द नाही; खोट्या प्रचाराला आळा—ना. मकरंद आबा पाटील यांची स्पष्ट भूमिका
उमेदवारीवर कोणालाही शब्द नाही; खोट्या प्रचाराला आळा—ना. मकरंद आबा पाटील यांची स्पष्ट भूमिका
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चा, अंदाज आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर अखेर पक्षाकडून अधिकृत आणि ठाम स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. बाबूराव संकपाळ आणि युवक अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत आबांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडत, महाबळेश्वर तालुक्यात अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही किंवा कोणालाही तसा शब्द दिलेला नाही, असे ठामपणे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर, काही व्यक्तींनी आबांच्या नावाचा गैरवापर करून “मला उमेदवारी मिळाली आहे” असा खोटा प्रचार करू नये, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाबूराव संकपाळ आणि युवक अध्यक्ष संतोष जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अशा अफवांमुळे पक्ष संघटनेत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता अधिकृत निर्णयाची वाट पाहावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना ना. मकरंद आबा पाटील यांनी सांगितले की, कोणताही निर्णय घेताना स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटनेतील सर्व घटकांना पूर्णपणे विश्वासात घेतले जाईल. विशेष म्हणजे, यावेळच्या निवडणुकीत तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा सकारात्मक विचार असल्याचेही आबांनी सूचित केले. सर्वसामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधारस्तंभ असून, त्याला केंद्रस्थानी ठेवूनच आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील इच्छुक उमेदवार आणि सर्व विभागांतील प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील राजकीय दिशा, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार असून, त्यानंतरच योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल, असेही संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, पक्ष संघटनेत कोणत्याही प्रकारची दुफळी निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ना. मकरंद आबा पाटील अधिकृतरीत्या जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने उभे राहावे, अशी नम्र पण ठाम विनंती तालुकाध्यक्ष बाबूराव संकपाळ आणि युवक अध्यक्ष संतोष जाधव यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना केली आहे. या स्पष्ट भूमिकेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
Comments
Post a Comment