बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कोट्यवधींची जमीन लाटण्याचा धक्कादायक प्रकार; महाबळेश्वर तालुक्यातील प्रकरणामुळे खळबळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात शेतजमीन बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे तालुक्यासह सातारा–पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. बनावट कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) तयार करून फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची मौल्यवान जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
याप्रकरणी आराधना संजयकुमार प्रसाद (वय ५४, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या वडिलांच्या मालकीची महाबळेश्वर तालुक्यातील मौजे पारुट येथील गट क्रमांक ३७/१, क्षेत्रफळ ४ हेक्टर ६२ आर, तसेच मौजे देवळी येथील बाबु धोंडू ढेबे यांच्या नावावर असलेली गट क्रमांक ७३/१, क्षेत्रफळ ० हेक्टर ९१ आर, अशी कोट्यवधी रुपयांची जमीन संगनमताने हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित विष्णु उत्तम सूर्यवंशी याने दिनांक १५ जून १९९८ रोजीचे खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केले. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे त्याने दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी संशयित पोपट बाळासाहेब गुंडगळ याच्याशी खरेदीखत करून (दस्त क्रमांक ३४३७/२०२५) सदर जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचा आरोप आहे.
हा व्यवहार कायदेशीर असल्याचा भास निर्माण करण्यासाठी इतर संशयितांनीही भूमिका बजावल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आशुतोष शंकरराव कदम (रा. कात्रज, पुणे) व दिपक कृष्णकांत कदम (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी साक्षीदार म्हणून, तर रणजित विश्वासराव काळभोर व प्रितम संतोष काळभोर (रा. पाल, ता. कराड) यांनी ओळखदार म्हणून सह्या केल्याचे समोर आले आहे. दस्तऐवज बनावट असल्याची जाणीव असूनही संगनमताने या सर्वांनी व्यवहारात सहभाग घेतल्यामुळे फिर्यादीची कोणतीही संमती नसताना जमिनीची विक्री करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या जमिनीच्या व्यवहारामागे आणखी कोणते व्यक्ती अथवा दलाल सहभागी आहेत का, तसेच यापूर्वी अशाच प्रकारे इतर जमिनींचे व्यवहार झाले आहेत का, याचाही तपास सुरू असून महाबळेश्वर तालुक्यातील जमिनींच्या व्यवहारांवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
Comments
Post a Comment