पंचायत समिती निवडणुकीत कायदेशीर वाद; संजय मोरे यांच्या उमेदवारीविरोधात समीर चव्हाण यांची बॉम्बे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल
पंचायत समिती निवडणुकीत कायदेशीर वाद; संजय मोरे यांच्या उमेदवारीविरोधात समीर चव्हाण यांची बॉम्बे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पंचायत समिती महाबळेश्वर सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुंभरोशी (वॉर्ड क्र. ६७) गणातील निवडणूक प्रक्रियेला कायदेशीर वळण लागले असून उमेदवार समीर मधुकर चव्हाण यांनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देत, विरोधी उमेदवार संजय हरिश्चंद्र मोरे यांची उमेदवारी अपात्र ठरवावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेनुसार, संजय मोरे हे अशोका मजूर सहकारी संस्था, उचाट (ता. महाबळेश्वर) या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष असून सदर संस्थेच्या नावे सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १६(१)(i) नुसार, शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कंत्राट घेणारी किंवा त्या कंत्राटात थेट अथवा अप्रत्यक्ष स्वारस्य असलेली व्यक्ती पंचायत समिती सदस्य होण्यास अपात्र ठरते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
नामनिर्देशन छाननीच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारी २०२६ रोजी समीर चव्हाण यांनी संजय मोरे यांच्या उमेदवारीवर हरकत दाखल केली होती. त्यावर संजय मोरे यांनी उत्तर देताना आपण संस्थेचे अध्यक्ष असल्याची कबुली दिली असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी लेखी युक्तिवादासह संबंधित वर्क ऑर्डरची प्रत सादर केली असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हरकत फेटाळत उमेदवारी वैध ठरवली, हा आदेश मनमानी व कायद्याच्या स्पष्ट तरतुदींना विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी “संस्था स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती आहे” असा निष्कर्ष काढत दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या आधीच्या निर्णयांच्या विरोधात असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण व आर्थिक स्वारस्य असल्यामुळे उमेदवारी अपात्र ठरते, असा ठाम मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला आहे.
या रिट याचिकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून संजय मोरे यांची उमेदवारी रद्द करावी, तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने कुंभरोशी गणासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणूक प्रक्रियेवर या याचिकेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment