अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस; भिलार व तळदेव गटात अपक्ष उमेदवारांची माघार, अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा
अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस; भिलार व तळदेव गटात अपक्ष उमेदवारांची माघार, अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 हा नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी 2.23 वाजेपर्यंत विविध गट व गणांमधील एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून उर्वरित वेळेत आणखी कोण कोण अर्ज माघारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार तळदेव गट क्रमांक 34 मधून अपक्ष उमेदवार रेणुका अजित संकपाळ यांनी आपला अर्ज माघार घेतली आहे. भिलार गट क्रमांक 35 मधून अपक्ष उमेदवार सुरेश कोंडीराम सपकाळ यांनी माघार घेतली असून भिलार गण क्रमांक 70 मधून अपक्ष उमेदवार कौसल्या संभाजी भिलारे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. याच भिलार गटातून अपक्ष उमेदवार कांचन अभय सावंत यांनी देखील अर्ज माघार घेतली आहे. मेटगुताड गणमधून अपक्ष उमेदवार चंद्राबाई वसंत चोरमले यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
याशिवाय भिलार गटातील सचिन सुरेश सपकाळ तसेच भिलार गणमधील वैशाली बिपीन भिलारे यांनीही आपले नामनिर्देशन अर्ज माघार घेतले आहेत. भिलार गणातून अपक्ष उमेदवार सविता रामचंद्र गोळे यांनी देखील निवडणूक लढतीतून माघार घेतल्याची नोंद दुपारी 2.23 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
आज संध्याकाळपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याने आणखी काही उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार का, यावर अंतिम लढतीचे चित्र अवलंबून आहे. अर्ज माघारीनंतर कोणत्या गटात थेट लढत होणार आणि कोणत्या ठिकाणी चुरशीची बहुपक्षीय लढत पाहायला मिळणार, हे स्पष्ट होणार असून महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment