कुंभरोशी गणात राजकीय खळबळ; संजय मोरे यांच्या उमेदवारीवर गंभीर आक्षेप, अर्ज रद्द करण्याची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंभरोशी गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्जांवर हरकतींचा सिलसिला सुरू झाला आहे. बिरवाडी, ता. महाबळेश्वर येथील रहिवासी समीर मधुकर चव्हाण यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती महाबळेश्वरचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संजय हरिश्चंद्र मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
या तक्रार पत्रात समीर चव्हाण यांनी नमूद केले आहे की संजय मोरे हे ‘अशोका मजूर संस्था’ या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष असून त्यांनी शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची अनेक कंत्राटे घेतलेली आहेत. त्यामुळे ते थेट सरकारी कंत्राटदार ठरत असून अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी होण्यासाठी ते अपात्र ठरतात, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी शासनाची काही उप-कंत्राटेही घेतल्याचे नमूद करत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की संजय मोरे यांच्यावर काही गुन्हेगारी खटले प्रलंबित असून ही बाब उमेदवारी अर्जात योग्य प्रकारे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्यावर बँकेचे कर्ज असूनही ही आर्थिक माहिती त्यांनी अर्जात जाणीवपूर्वक लपवली असल्याचा गंभीर आरोप समीर चव्हाण यांनी केला आहे. उमेदवारी अर्जात संपूर्ण व सत्य माहिती न दिल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या सर्व बाबींचा विचार करता संजय मोरे यांनी महत्त्वाची माहिती लपवून नियमांचे उल्लंघन केले असून ते अपात्र ठरतात, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी समीर चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीमुळे कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीत नव्याने वादाला तोंड फुटले असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, संजय मोरे यांचे प्रतिनिधी सुभाष करंडे यांनी या तक्रारीसंदर्भात वकिलामार्फत उत्तर दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकारी दुपारनंतर खुलासा करतील, अशी माहिती देण्यात आली असून त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment