आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम; महाबळेश्वर–पाचगणी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी, खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश
आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम; महाबळेश्वर–पाचगणी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी, खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर–पाचगणी हा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता सध्या गंभीर दुरवस्थेत असून पावसाळ्यानंतर पडलेले मोठमोठे खड्डे अद्याप पूर्णपणे बुजवले गेलेले नाहीत. या रस्त्यावर एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेली तात्पुरती व निकृष्ट दर्जाची डागडुजी थांबवून दर्जेदार काम करण्यात यावे, अशी ठाम भूमिका सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी घेत २६ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत प्रशासन हालचालीत आले असून त्याचा थेट परिणाम म्हणून आज एमएसआयडीसीचे अधिकारी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले.
या पार्श्वभूमीवर एमएसआयडीसीचे प्रोजेक्ट मॅनेजर समीर राठे आणि अभियंता श्रीनिवास रेड्डी हे महाबळेश्वरमध्ये आले असता नागरिक, टॅक्सी संघटना व स्थानिक प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, महाबळेश्वर टॅक्सी युनियनचे चालक, ट्रॅक्टर चालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीला सी. डी. बावळेकर, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, सुरेश अप्पा साळुंखे, शंकर ढेबे, बाळकृष्ण साळुंखे, नंदकुमार वायदंडे, इमाम नालबंद, प्रवीण शिंदे, ओंबळे मॅडम, दादा मानकर, इरफान कुरेशी यांच्यासह माजी नगरसेवक युसुफ शेख व गिरीश नायडू आदी उपस्थित होते.
चर्चेदरम्यान केवळ कार्यालयीन बैठकीतून नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊनच समस्येचे गांभीर्य समजून घ्यावे, असा आग्रह नागरिकांनी धरला. त्यानुसार सर्व अधिकारी आणि ग्रामस्थांनी महाबळेश्वर–पाचगणी मुख्य रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आली. अनेक ठिकाणी मोठे खड्डे, वाहतुकीस धोका निर्माण करणारी परिस्थिती आणि सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सध्या सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम तत्काळ थांबवून योग्य साहित्याचा वापर करून टिकाऊ व दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली. यावर एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच प्रशासन जागे झाले असून प्रत्यक्ष पाहणी व चर्चा घडून आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.
मात्र दिलेल्या मुदतीत प्रत्यक्षात दर्जेदार काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा ग्रामस्थ व टॅक्सी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाबळेश्वर–पाचगणी रस्त्याबाबत प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment