अहिरच्या सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा; तळदेव गटात शिवसेना आघाडीवर
अहिरच्या सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा; तळदेव गटात शिवसेना आघाडीवर
✍️संतोष मालुसरे ,
तापोळा प्रतिनिधी –
तापोळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळदेव गटात शिवसेना आघाडीवर दिसत असून, काल अहिर येथे झालेल्या भव्य प्रचार सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्यात आला. अहिर गाव हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या निवडणुकीत शंभर टक्के साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार गावकऱ्यांनी जाहीर सभेत एकमुखाने व्यक्त केला.
अहिर, वाळणे, गावधोशी, गाढवली आणि आवळण या गावांसाठीची संयुक्त प्रचार सभा अहिर येथील केदारेश्वर मंदिरात पार पडली. या सभेला माजी आमदार दगडू दादा सकपाळ, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अजित सकपाळ व संजय शेलार यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘शिवसेना जिंदाबाद’ आणि ‘साहेबांच्या पाठीशी आम्ही ठाम’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता.
तापोळा–अहिर या जोड फुलामुळे कोयना विभागातील जनतेचे राहणीमान उंचावणार असून विकासाला गती मिळणार असल्याचे सभेत सांगण्यात आले. दळणवळणाच्या सोयी अधिक सक्षम होतील, तसेच उतेश्वर मंदिराच्या विकासामुळे या भागात पर्यटनाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सर्व विकासकामांना बळ देण्यासाठी कोयना विभागातील जनतेने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची जाहीर भूमिका घेतली.
सभेला संबोधित करताना माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर शिवसेना काम करत असल्याचे सांगत जनतेने एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण भाषणांतून शिवसेनेच्या कामाचा लेखाजोखा मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
या सभेस श्री. चंदू गुरुजी, श्री. सुनील नलावडे, श्री. हरिभाऊ सकपाळ, राष्ट्रीय शिव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, काळेश्वरी बोट क्लबचे सचिव श्री. शिवाजी सकपाळ, श्री. नारायण शेलार, श्री. प्रकाश सकपाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. अहिर येथील या सभेमुळे तळदेव गटात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
Comments
Post a Comment