पंचायत समिती निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती जाहीर; सातारा जिल्ह्यात ११ पंचायत समित्यांवर लक्ष
पंचायत समिती निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती जाहीर; सातारा जिल्ह्यात ११ पंचायत समित्यांवर लक्ष
सातारा, दि. १९ — सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ११ पंचायत समित्यांच्या निवडणुका पारदर्शक, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाकडून काटेकोर देखरेख राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा, कराड व पाटण या तालुक्यांसाठी सुषमा सातपुते, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सातारा येथील शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास असणार असून नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेबाबत तक्रारी किंवा सूचना नोंदविण्यासाठी त्या उपलब्ध राहणार आहेत.
जावली, वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्यांसाठी अमोल यादव, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते महाबळेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असणार असून या चारही तालुक्यांतील निवडणूक प्रक्रियेवर ते लक्ष ठेवणार आहेत.
खटाव, कोरेगाव व माण या तालुक्यांसाठी सरिता नरके, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या संबंधित शासकीय विश्रामगृहात राहून या तीनही तालुक्यांतील निवडणूक कामकाजावर देखरेख करणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, उमेदवारांचे अर्ज, प्रचार, मतदान व मतमोजणी या सर्व टप्प्यांवर निरीक्षकांकडून लक्ष ठेवले जाणार असून कोणतीही तक्रार किंवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुका अधिक शिस्तबद्ध व विश्वासार्ह पद्धतीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment