अनुभवातून व्यवहाराचे धडे; महाबळेश्वर तालुक्यातील जावली गावात विद्यार्थ्यांचा प्लास्टिकमुक्त ‘बाल बाजार’ चर्चेचा विषय

अनुभवातून व्यवहाराचे धडे; महाबळेश्वर तालुक्यातील जावली गावात विद्यार्थ्यांचा प्लास्टिकमुक्त ‘बाल बाजार’ चर्चेचा विषय

कुंभरोशी प्रतिनिधी  –

महाबळेश्वर तालुक्यातील जावली गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्रत्यक्ष जीवनाची जोड देत अनुभवातून व्यवहाराचे महत्त्वाचे धडे आत्मसात केले. जावली फाटा येथे शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल बाजार’ या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या बाल बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत विविध भाजीपाला, पाणीपुरी, पापड, मसाले तसेच अन्य खाद्यपदार्थांची विक्री करत खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, व्यवहारिक ज्ञान वाढवणे, पैशांचे नियोजन, ग्राहकांशी संवाद साधणे आणि संघभावना विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल उभारणे, दर ठरवणे, ग्राहकांना आकर्षित करणे, हिशेब ठेवणे अशा सर्व बाबी जबाबदारीने पार पाडल्या. विशेष म्हणजे हा संपूर्ण बाल बाजार प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. लहान वयातच पर्यावरणाबाबतची ही जाणीव पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

या बाल बाजाराला जावलीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भेट दिली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. “पुस्तकातील शिक्षणाबरोबरच अशा उपक्रमांमधूनच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडते,” अशी प्रतिक्रिया अनेक पालक व नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील शाळांनीही अशा उपक्रमांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

या वेळी सरपंच श्री. गणपत बाबू मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. कृष्णा रामचंद्र मोरे, उपाध्यक्ष सौ. शैला नितीन गायकवाड, सदस्य श्री. दिपक विठ्ठल मोरे, श्री. राजेंद्र बाबू शेटे, श्री. रमेश शंकर मोरे, सौ. अश्विनी प्रशांत मोरे, मुख्याध्यापक सौ. वैशाली जनार्दन कदम, श्री. अंकुश पांडुरंग माळी, श्रीम. वैशाली तुकाराम भोसले, श्री. शांताराम राघू मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

शिक्षण केवळ परीक्षापुरते न राहता जीवनाशी जोडले गेले पाहिजे, हे जावली गावातील या बाल बाजारातून अधोरेखित झाले आहे. अनुभवातून शिकण्याची ही पद्धत विद्यार्थ्यांना भविष्यात सक्षम नागरिक बनवण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी सकारात्मक चर्चा सध्या महाबळेश्वर तालुक्यात होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl