महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित
महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर भिलार गटातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांचे चित्र समोर आले असून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.
भिलार गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सुरेश कोंडीराम सपकाळ, कांचन अभय सावंत आणि सचिन सुरेश सपकाळ यांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतले. त्यामुळे भिलार गटातून भाजपच्या रंजना संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चंदर केळगणे आणि शिवसेनेचे प्रदीप विठ्ठल चपटे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.
तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार थेट मैदानात उतरल्याने भिलार गटातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासकामे, मूलभूत सुविधा, पर्यटनाशी संबंधित प्रश्न तसेच गावपातळीवरील विविध समस्या हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भिलार गटात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद निवडणुकीतील ही तिरंगी लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment