वाई–भुईंज–मेढा परिसरात रात्री घरफोडीचा संशय; महाबळेश्वर पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वाई–भुईंज–मेढा परिसरात रात्री घरफोडीचा संशय; महाबळेश्वर पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, मागील चार ते पाच दिवसांपासून वाई, भुईंज व मेढा परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडीच्या संशयास्पद घटना घडत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रात्री १२ ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम वयस्कर लोक राहत असलेल्या घरांमध्ये घुसून मारहाण करून घरातील सोने व मौल्यवान दागिने चोरी करून नेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या घरांचे स्थान सामान्य लोकवस्तीपासून दूर आहे आणि ज्या घरांमध्ये वयस्कर नागरिक वास्तव्यास आहेत, त्यांनी रात्री अपरात्री कोणीही दरवाजा वाजविल्यास दरवाजा उघडू नये, असे स्पष्ट आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच घरामध्ये सोने, नाणे, मौल्यवान वस्तू शक्यतो ठेवू नयेत किंवा त्यांची योग्य सुरक्षित व्यवस्था करावी, असेही सांगण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना असेही आवाहन केले आहे की, परिसरात कोणतेही संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. वेळेत माहिती मिळाल्यास संभाव्य गुन्हे रोखणे सोपे जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत 84338 15833, 9850593018 या मोबाईल क्रमांकांवर किंवा लँडलाईन क्रमांक 02168-260333 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावरही तात्काळ संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात गस्त वाढविण्यात येत असून नागरिकांच्या सहकार्यानेच अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालता येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment