कुंभरोशी गणात हरकत नामंजूर; संजय हरिश्चंद्र मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश

कुंभरोशी गणात हरकत नामंजूर; संजय हरिश्चंद्र मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुंभरोशी (गण क्र. ६७) येथून शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल केलेले श्री. संजय हरिश्चंद्र मोरे यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले असून त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. याबाबतचा सविस्तर आदेश दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय, महाबळेश्वर येथे झालेल्या छाननीनंतर देण्यात आला.

या प्रकरणात श्री. समीर मधुकर चव्हाण, रा. बिरवाडी, ता. महाबळेश्वर यांनी श्री. संजय हरिश्चंद्र मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर विविध आक्षेप नोंदविले होते. संजय मोरे हे अशोका मजदूर सहकारी संस्थेचे चेअरमन असून त्यांनी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे घेतली आहेत, त्यांच्यावर गुन्हे प्रलंबित आहेत, ते उपठेकेदार आहेत तसेच त्यांनी बँक कर्ज व थकबाकीची माहिती लपवली असल्याचा दावा हरकत अर्जात करण्यात आला होता. या सर्व आक्षेपांच्या अनुषंगाने हरकतदार व प्रतिवादी दोघांनाही आपले म्हणणे व पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान संजय मोरे यांच्यावतीने अ‍ॅडव्होकेट उमेश शिर्के यांनी सविस्तर कायदेशीर युक्तिवाद केला. आक्षेप सिद्ध करण्याची जबाबदारी हरकतदारावर असून, मात्र हरकतदाराने कोणताही ठोस व सबळ पुरावा सादर केलेला नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तिवादांचा विचार करून निष्कर्ष नोंदवले.

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, हरकतदाराने सादर केलेली अशोका मजदूर सहकारी संस्थेची सभासद यादी ही सन २०२२ मधील असून चालू निवडणूक प्रक्रियेसाठी ती ग्राह्य धरता येत नाही. तसेच केवळ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणून उमेदवारी अर्ज नाकारणे योग्य ठरत नाही. उपठेकेदार असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. कर्ज व थकबाकीबाबत प्रतिवादीने सक्षम प्राधिकाऱ्यांचा ‘थकबाकीदार नसल्याचा दाखला’ जोडलेला असून, शपथपत्रातील बाबींची सत्यता तपासण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १५ व १६ मधील तरतुदींची पूर्तता होत असल्याने संजय हरिश्चंद्र मोरे यांचे दिनांक २० जानेवारी २०२६ व २१ जानेवारी २०२६ रोजी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले. परिणामी हरकतदार समीर मधुकर चव्हाण यांचा आक्षेप(हरकत )अर्ज फेटाळण्यात आल्याचा स्पष्ट आदेश निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.

या निर्णयामुळे कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीत संजय मोरे यांचा मार्ग मोकळा झाला असून, या आदेशाने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl