महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; मंत्र्यांची प्रतिष्ठा, बालेकिल्ल्यांची लढाई आणि नाराजीचा फॅक्टर ठरणार निर्णायक
महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; मंत्र्यांची प्रतिष्ठा, बालेकिल्ल्यांची लढाई आणि नाराजीचा फॅक्टर ठरणार निर्णायक
महाबळेश्वर प्रतिनिधी–
महाबळेश्वर तालुक्यात सध्या निसर्गाच्या गारव्यापेक्षा राजकारणाची उष्णता अधिक तीव्रतेने जाणवत असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुका राजकीय रणधुमाळीत अडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करत प्रचाराचा वेग वाढवला असून अनेक गट व गणांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती अटळ ठरणार आहेत. सत्ताधारी पक्षच परस्परांविरोधात उभे ठाकल्याने ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची न राहता प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे.
या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी निवडणुकीत पूर्ण ताकद झोकून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक गटातील निकाल हा थेट या नेत्यांच्या राजकीय प्रभावाचे मोजमाप ठरणार आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भिलार गटात यंदा राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून राष्ट्रवादीने संजय केळगणे यांना उमेदवारी दिली असून भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सपकाळ यांना उतरवत थेट आव्हान दिले आहे. भिलार गणात मात्र राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. माजी सरपंच वंदना प्रवीण भिलार यांना उमेदवारी दिल्याने बाळासाहेब भिलार कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. इच्छुक तेजस्विनी भिलार यांनी माघार घेतली असली तरी ही नाराजी कितपत निवळते, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. या गणात भाजपकडून सुप्रिया अनिल भिलार, तर शिवसेनेकडून कौसल्या भिलार किंवा पूनम गोळे यांच्यापैकी एक उमेदवार असल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.
मेटगुटाड गणात राष्ट्रवादीने शकुंतला रमेश चोरमले यांना उमेदवारी दिली असून भाजपने अमीन नदीम शारवान यांना संधी दिली आहे. मात्र यामुळे राष्ट्रवादीतील अमोल चोरमले आणि चंद्राबाई चोरमले यांनी बंडखोरीचा सूर पकडल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेकडून माजी सभापती दिवंगत धोंडीराम जाधव यांच्या स्नुषा वैशाली जाधव मैदानात असल्याने येथेही तिरंगी लढत रंगणार आहे. जातीची समीकरणे आणि स्थानिक निष्ठा यांचा मेळ कुणाच्या बाजूने झुकतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
तळदेव गट हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. हा गड परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने माजी सभापती संजय गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेने खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय अजित रामचंद्र सपकाळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच भाजपमध्ये गेलेले सुभाष सोंडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे अभिषेक आत्माराम शिंदे यांच्यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे. कुंभरोशी गणात राष्ट्रवादीने युवा चेहरा सचिन उतेकर यांना संधी दिली असून शिंदे गटाचे संजय मोरे आणि भाजपचे सुरेश जाधव यांच्याशी त्यांना थेट सामना द्यावा लागणार आहे.
तळदेव गणात राष्ट्रवादीने संजय उतेकर यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक सागर कदम यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. येथे शिवसेनेचे संजय शेलार, ठाकरे गटाचे अभिषेक शिंदे आणि भाजपचे गोविंद सकपाळ यांच्यातही चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या गणात ज्येष्ठ नेते बाबूदादा सकपाळ यांची भूमिका राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
संपूर्ण तालुक्यात प्रचाराचा धुरळा उडू लागला असून राष्ट्रवादी आपले बालेकिल्ले टिकवण्यासाठी तर शिवसेना आणि भाजप ते भेदण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. उमेदवारी वाटपातून निर्माण झालेली नाराजी सर्वच पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. भिलारमधील भिलार घराणे, मेटगुटाडमधील चोरमले कुटुंब आणि तळदेवमधील कदम कुटुंबाची भूमिका निकालाला कलाटणी देऊ शकते. ही नाराजी वेळीच थोपवली गेली नाही, तर मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निवडणुकीत तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्याचे पडसाद भविष्यातील राजकीय समीकरणांवर उमटणार आहेत. स्थानिक पातळीवर राजेंद्र राजपुरे, बाबूराव सकपाळ, नितीन भिलारे, राजू भिलारे, किसन भिलारे, डी. एम. बावळकर, संजय मोरे, सुभाष कारंडे आणि गणेश उतेकर यांच्यासारख्या नेत्यांसाठी ही निवडणूक नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे. वरवर युती असली तरी कार्यकर्त्यांच्या मनात जुन्या संघर्षांच्या आठवणी अजूनही ताज्या असून महाबळेश्वरच्या गावागावात राजकीय तणावाचे वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे.
Comments
Post a Comment