जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा तेजस्वी इतिहास पुन्हा प्रकाशात; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन
जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा तेजस्वी इतिहास पुन्हा प्रकाशात; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
शिवपूर्व काळापासून आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने जावली प्रांतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास पुन्हा एकदा समाजासमोर मांडला जाणार आहे. ‘जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ यांच्या वतीने समस्त जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे द्वितीय स्नेहसंमेलन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ऐतिहासिक व्याख्यान – भाग दुसरा’. या व्याख्यानात मौर्य काळापासून ते जावलीकर मोरे घराण्यापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास, स्वराज्य स्थापनेपूर्वीची जावलीची राजकीय व सामाजिक स्थिती तसेच स्वराज्य उभारणीच्या काळातील संवेदनशील सत्ता-संघर्ष यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व ज्येष्ठ इतिहासकार अप्पा परब यांच्या सुकन्या शिल्पा परब या ‘तर्क, अफवा आणि वस्तुस्थिती’ या विषयावर अभ्यासपूर्ण व संशोधनाधारित मांडणी करणार असून, इतिहासाबाबत पसरलेल्या गैरसमजांवर त्या प्रकाश टाकणार आहेत.
“इतिहास जर आपण सांगितला नाही, तर तो विकृत केला जातो,” या ठाम भूमिकेतून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जावलीच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावलेल्या मोरे घराण्याचा खरा इतिहास आजही अनेक पिढ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आणणे, तुटलेली नाती जोडणे, आपुलकीची भावना वृद्धिंगत करणे आणि भावी पिढीला आपल्या कुळाचा स्वाभिमानी व सत्याधिष्ठित इतिहास समजावून देणे, हा या स्नेहसंमेलनामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हे स्नेहसंमेलन रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, नवीन महाड नगरपालिका इमारतीजवळ, महाड येथे होणार आहे. कार्यक्रमात ऐतिहासिक व्याख्यानासह कुलस्नेह भेट, आपुलकीचा संवाद आणि सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केवळ एक सामाजिक मेळावा नसून तो आपल्या इतिहासाची जाणीव करून देणारे ‘कर्तव्यस्मरण’ असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आपल्या कुळाचा स्वाभिमान जपण्यासाठी, ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एकतेचा संदेश देण्यासाठी समस्त ‘राव’ मोरे परिवाराने सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८१९०५३२६२ किंवा ९९२३०२००२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.
Comments
Post a Comment