तळदेव गणात भाऊसाहेब मोरे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; पंचायत समिती उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल होणार
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गणामध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आमशी गावचे माजी सरपंच तथा युवा नेतृत्व भाऊसाहेब मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दिनांक २० रोजी भाऊसाहेब मोरे हे मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने तळदेव गणासह संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्याकडून मिळालेली राजकीय शिकवण, जननायक आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांचे विकासाचे स्वप्न, सहकाररत्न सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजूशेठ राजपुरे आणि माजी सभापती संजय गायकवाड यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेला अनुभव व मार्गदर्शन यांचा लाभ घेत भाऊसाहेब मोरे यांनी लहान वयातच आमशी गावाच्या सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून मिळालेले हे पदच आपल्या कामाची खरी पोहोचपावती असल्याचे ते सांगतात.
समाजसेवेसोबत राजकारणाची साथ असल्यास विकासकामांना योग्य न्याय मिळतो, या भावनेतून भाऊसाहेब मोरे यांनी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याची त्यांची क्षमता आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढण्याची भूमिका यामुळे तळदेव गणात त्यांना मोठा जनाधार मिळाला आहे.
मंत्री महोदयांच्या माध्यमातून तळदेव गणात झालेली विविध विकासकामे आणि आपला व्यापक जनसंपर्क याच जोरावर उमेदवारी मिळावी, असा आग्रह भाऊसाहेब मोरे यांनी धरला आहे. उमेदवारी मिळाल्यास मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या अर्ज दाखल कार्यक्रमात कार्यकर्ते, समर्थक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
या शक्तीप्रदर्शनातून तळदेव गणातील जनतेचा भाऊसाहेब मोरे यांच्यावरील विश्वास आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रम हा केवळ औपचारिकता न राहता आगामी निवडणुकीची दिशा ठरवणारा महत्त्वाचा राजकीय संकेत ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Comments
Post a Comment