कुंभरोशी गणात विकासाचा ठाम निर्धार; सुरेश (आप्पा) जाधव यांचा जाहीरनामा मतदारांसमोर
कुंभरोशी गणात विकासाचा ठाम निर्धार; सुरेश (आप्पा) जाधव यांचा जाहीरनामा मतदारांसमोर
कुंभरोशी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुं भरोशी गणासाठी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेश (आप्पा) हरिभाऊ जाधव यांनी आपला विकासाभिमुख जाहीरनामा मतदारांसमोर सादर केला आहे. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती महाबळेश्वर सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत 67 कुं भरोशी गणातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांतील सामाजिक कार्य, कामगार हक्कांसाठीचा लढा आणि ग्रामीण विकासाचा अनुभव मांडत “मी शब्दांवर नाही, कामावर विश्वास ठेवतो” असा ठाम संदेश दिला आहे.
प्रतापगड, तालुका महाबळेश्वर येथील रहिवासी असलेले सुरेश जाधव हे श्री रामवरदायिनी जंगल कामगार मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन तसेच श्रीरामवरदायिनी कामगार ग्रुप, प्रतापगडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. असंघटित कामगारांना एकत्र आणून त्यांना न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेची दिशा देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून 105 गाव समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. सन 2021 मधील अतिवृष्टीच्या काळात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असताना त्यांनी पुढाकार घेऊन सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली व नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले.
जाहीरनाम्यात शिक्षण, रोजगार, शेती, पाणी आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक गावात विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य व डिजिटल शिक्षणाचा लाभ देणे, शाळांमधील पाणी व स्वच्छतागृहांसह भौतिक सुविधा सुधारणे यावर भर देण्यात आला आहे. स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगार मार्गदर्शन व रोजगारनिर्मिती, पर्यटन विकासामार्फत होम स्टे व कृषी पर्यटनाला चालना देणे, स्वयंरोजगार, लघुउद्योग व पर्यटनपूरक संधी निर्माण करणे हे महत्त्वाचे मुद्दे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, सामूहिक शेती उपक्रम राबवून उत्पादन खर्च कमी करणे, बाजारपेठेशी थेट संपर्क साधून उत्पन्नवाढीचे मार्ग उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी मांडला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत व कायमस्वरूपी योजना, अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी दर्जेदार व टिकाऊ विकासकामे, अंतर्गत रस्ते व दळणवळण सुविधा बळकट करणे, महिला, कामगार आणि शेतकरी यांना एकत्र आणणारे उपक्रम राबवणे आणि प्रशासन व नागरिकांमध्ये विश्वासाचा सेतू म्हणून काम करणे हे मुद्देही जाहीरनाम्यात अधोरेखित करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देश व राज्यात जसा विकास झाला, तसाच विकास कुं भरोशी गणात घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत, निवडून आल्यास केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावर विकास करून दाखवण्याचा ठाम निर्धार सुरेश (आप्पा) जाधव यांनी व्यक्त केला आहे. येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या मतदानात मतदारांनी “कमळ” चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment